The brotherhood of the wisher to become the Vice-Chancellor | कुलगुरू होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी
कुलगुरू होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

ठळक मुद्देविद्यापीठ : आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; लवकरच होणार मुलाखती

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मागविण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांना राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातीलही अनेकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील इच्छुकांनी राजकीय पाठिंबा मिळविण्यासाठी भेटीगाठींना सुरुवातही केली. त्यामुळे कुलगुरू कोण होणार? या चर्चेस उधाण आले आहे.
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून रोजी पूर्ण होत आहे. त्यांच्या जागेवर प्रभारी व्यक्ती काही दिवस कारभार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभारी म्हणून जळगाव किंवा नांदेड येथील विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार सोपविण्यात येईल. १८ एप्रिल रोजी नवीन कुलगुरू निवडण्यासाठी नेमलेल्या शोध समितीने आॅनलाईन अर्ज मागविले होते. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ही २२ मेपर्यंत होती. ही मुदत संपली आहे. शोध समितीच्या नोडल अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अद्याप आॅनलाईन आलेल्या अर्जांची माहिती अपडेट केली नाही. तसेच त्याची जुळवणीही केली नसल्याचे सांगितले. कुलगुरू पदासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ पेक्षा अधिक जणांनी अर्ज केले आहेत, तर नांदेड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि अमरावती येथूनही प्रत्येकी तीन-चार अर्ज करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठात कार्यरत असलेले प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गायकवाड, माजी बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, डॉ. के.व्ही. काळे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, माजी कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. एम.बी. मुळे, डॉ. आर. मार्टिन, डॉ. सी.जे. हिवरे यांनी अर्ज केल्याचे समजते. याचवेळी शहरातील देवगिरी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, देवगिरीचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, बीडचे प्राचार्य डॉ. वसंतराव सानप हेसद्धा इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय नांदेड येथील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, माजी प्रकुलगुरू डॉ. जी.एन. शिंदे, डॉ. डी.एम. खंदारे, डॉ. डी. बी. पासलकर यांनीही अर्ज केले आहेत.
चौकट,
मागासवर्गीय कुलगुरू मिळणार?
विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक होण्याची शक्यता उच्चशिक्षण वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. राज्यातील काही विद्यापीठांचा अपवाद वगळता कुलगुरूपदी उच्चवर्णीय प्रवर्गातील व्यक्तींनाच संधी मिळालेली आहे. त्यामुळे याठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गातील कुलगुरू देण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठ प्राध्यापक कास्ट्राईब महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या शिष्टमंडळाने शासनाकडे केली आहे.
नव्या कुलगुरूंसमोर आव्हानांची मालिका
विद्यापीठाला मिळणाºया नव्या कुलगुरूंसमोर आव्हानांची मालिका असणार आहे. विद्यापीठात एकही संवैधानिक अधिकारी पूर्णवेळ नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याशिवाय विद्यापीठाला आर्थिक शिस्त लावावी लागणार आहे. ‘नॅक’ मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असल्यामुळे आर्थिक ताळेबंद बिघडलेला आहे. याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील विस्कळीतपणा दूर करावा लागणार आहे.


Web Title: The brotherhood of the wisher to become the Vice-Chancellor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.