Bio Diversity Day: Rich Bio-forest, True value! | Bio Diversity Day : समृद्ध जैव-वन, हेची खरे धन..!
Bio Diversity Day : समृद्ध जैव-वन, हेची खरे धन..!

- यादव तरटे पाटील
ज्ञात ग्रहांपैकी पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झाले. उत्क्रांतीनुरूप त्या सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानवासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखासमाधानाने नांदत होती. मात्र, मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, ग्रामवासी व नगरवासी, अशी त्रिस्तरीय वस्तीव्यवस्था निर्माण झाली. यातच मानवप्राणी आपल्या बुद्धीनुरूप इतर सजीवांवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. कालांतराने खेडी निर्माण झाली आणि आता शहरे प्रचंड फुगायला लागली.

निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र जंगल व जैवविविधतेपासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. मानव स्वत: ज्याच्या घटक आहे तीच पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली आहे. जंगलातीलही अन्नजाळे व अन्नसाखळी कमालीची प्रभावित झाली आहे. काही सजीव नष्ट झाले, तर काही नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. जैवविविधता व जंगलाच्या सहजीवनाचा हा प्रवास विनाशाच्या उंबरठ्याकडे जातोय.
जंगल जैवविविधता ही एक व्यापक संज्ञा आहे, जी जंगल क्षेत्रातील आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेतील सर्व जिवंत जीवनाशी संबंधित आहे. केवळ झाडांवरच नाही, तर विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी आणि सूक्ष्मजीव जंगल भागात राहतात. त्यांची गुणसूत्र विविधता असते. पारिस्थितीकी, भूप्रदेश, प्रजाती, जीवसंख्या, जीवसमुदाय, आनुवंशिकीसह विविध स्तरांवर हे समजू शकते. या स्तरांमध्ये आणि त्यांच्यादरम्यान काही गुपित संवाद असू शकतात. जंगलातील जैवविविधतेमध्ये ही गुपितता प्राण्यांना त्यांच्या सतत पर्यावरणीय परिस्थितींमध्ये व्यवस्थापित करण्यात मदत करते. जंगल, जैवविविधता आणि पारिस्थितिकी तंत्र अधिक कार्यक्षम ठरते.

जंगल प्रभावित झाले म्हणजेच जैवविविधता प्रभावित होणारच. वन, आरोग्य, कौशल्य, जैवविविधता, पारिस्थितिक तंत्रांचे व्यवस्थापन, हवामानातील बदल कमी करणे यासारख्या जंगली उद्दिष्टे आणि सेवा यापुढे जंगलांच्या महत्त्वाचा भाग मानले जातात. जैवविविधता अधिवेशनात (सीबीडी), जंगलांना जैविक विविधतेच्या विस्तृत कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. २००२ मध्ये सीबीडी सदस्य देशांच्या सहाव्या बैठकीत हा निर्णय स्वीकारण्यात आला. जंगल आणि जैवविविधतेचे संरक्षण, जंगल आनुवांशिक स्रोतांचा उचित वापर आदींवर लक्ष केंद्रित केलेले उद्दिष्ट आणि कार्ये समाविष्ट आहेत. जैवविविधता कार्यक्रमात काही महत्त्वाचे तथ्य समाविष्ट आहेत; ते संवर्धन, संरक्षण, टिकाऊ वापर, नफा सामायीकरण, संस्थात्मक आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या योग्य वातावरण आणि ज्ञान मूल्यांकन आणि देखरेख अशा विविध तत्त्वांवर आधारित आहे.    

भारत जागतिक दहा देशांतील जैवविविधतेत आठव्या क्रमांकावर असला तरी भारतात प्रतिवर्षी १४ लाख हेक्टर जंगल नष्ट होते. सन २००५ ते २०११ या कालावधीत एकट्या महाराष्ट्रात ६,६३७ हेक्टर वनक्षेत्र नवीन रेल्वेमार्ग, वीजनिर्मिती प्रकल्प, खानव्यवसायामुळे कमी झाले आहे. जंगल आणि जैवविविधता हे परस्परपूरक घटक आहे. जंगल जैवविविधतेला जीवन देते, तर जंगल स्वत:देखील जैविविविधतेचाच घटक आहे. जंगलातील लता, वेली, झुडपे, वृक्ष यावर जैवविविधता नांदते, तर वाघापासून ते वाळवीपर्यंतची संपूर्ण जैवविविधता जंगलाला जीवन जगविते. उदाहरण जंगलातील झाडावर कीटकांचे जीवन अवलंबून आहे, तर हीच झाडे मृत पावल्यावर त्याला कुजवून नवीन वनस्पती व झाडांना खतनिर्मिती करण्याच कार्य कीटक करतात. सहजीवानाच्या धाग्याने घट्ट जोडल्या गेलेल्या आणि परस्परपूरक असलेल्या या नात्यात आपण हस्तक्षेप करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मानवाला आॅक्सिजन देणारी झाडे, परागीभवनातून अन्न देणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरे व इतर कीटकसृष्टी हे सर्व जंगल जैवविविधता यातील मुख्य घटक आहेत. या अर्थानेही मानवाला जागविणारे जंगल आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा आजच्या दिवशी संकल्प करूया. 

४५ टक्के जंगल नष्ट
गेल्या ८,००० वर्षांत, पृथ्वीच्या मूळ जंगलाच्या ४५ टक्के भाग नाहीसा झालाय. यातील बहुतेक भाग गेल्या शतकात कमी झालाय. अन्न व कृषी संघटनेच्या अंदाजामध्ये पिकांच्या कापणीमुळे दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ प्रभावित होते. सन २००० ते २००५ दरम्यान वन क्षेत्राचे वार्षिक नुकसान ७३ लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र जगाच्या जंगल क्षेत्राच्या ०.१८ टक्का एवढे आहे. 

( लेखक हे दिशा फाऊंडेशन, अमरावती येथे वन्यजीव अभ्यासक आहेत, www.yadavtartepatil.com ) 


Web Title: Bio Diversity Day: Rich Bio-forest, True value!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.