ठळक मुद्दे वृक्ष-वेलीच्या रूपात बनविल्या राख्या  राखीवर विविध झाडांच्या बिया लावलेल्या आहेत.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीला तिचे रक्षण करण्याचे यादिवशी भाऊ वचन देतो. रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. दरवर्षीप्रमाणे बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या साक्षी मिठावाला या महिलेने शाडू मातीपासून ‘पर्यावरणरक्षक राखी’ बनवली आहे. या राखीवर कडुलिंब, कढिपत्ता, चिंच, तुळस अशा विविध वनस्पतींच्या आणि मोठमोठ्या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. चला तर मग, यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष-वेलींच्या रूपात वाढवूया बहीण-भावाचे प्रेम...!!

गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या लेख मिठावाला आणि साक्षी मिठावाला या दाम्पत्याने ही ‘इको फ्रेंडली राखी’ बनवली आहे. ही राखी शाडू मातीपासून बनलेली आहे. त्यावर आकर्षक रंगांसह काही वनस्पतींच्या बियादेखील चिकटविलेल्या आहेत. ही राखी वजनाने अत्यंत हलकी असून, ती तुम्हाला भावाच्या हातावर सहजपणे बांधता येईल. रक्षाबंधनाचा सण पार पडल्यानंतर ती राखी फेकून न देता जमिनीत तुम्ही ती रोवू शकता. जेणेकरून त्या बियांपासून चार-पाच रोपे तयार होतील. या राख्यांवर कढिपत्ता, तुळस, मेथी, धणे, भोपळा, काकडी, कडुलिंबू, चिंच या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. या दाम्पत्याने आतापर्यंत अशा १५० राख्या बनवल्या आहेत. एक राखी बनवण्यासाठी जवळपास दहा ते वीस मिनिटे लागतात. 

संदेशात्मक राखी कीट...
साक्षी लेख मिठावाला सांगतात, ‘भावा-बहिणीच्या नात्याचा ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करण्यासाठी या इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या राख्या योग्य असणाऱ्या असून, या माध्यमातून तुम्ही बहिणीसाठी चार ते पाच रोपे लावू शकता. इको फ्रेंडली वस्तूंबाबत समाजात असलेली जागरूकता पाहता या राख्यांना शाळा, महाविद्यालये यांच्यामधूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

शिवाय या कीटमध्ये इको फ्रें डली पेन्सिलही आहे. या पेन्सिल आम्ही रद्दी पेपरपासून बनवतो, तसेच कीटमध्ये एक संदेशही अत्यंत सुंदर देण्यात आला आहे,‘या रक्षाबंधनाला भावासोबतच पर्यावरणाचेही रक्षण करा.’ या पेन्सिललाही भेंडी, काकडी, तीळ, वांगी अशा अनेक भाज्यांच्या बिया लावलेल्या आहेत. यादृष्टीने जेणेकरून यापासून लावलेल्या विविध रोपांमुळे आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल.    


Web Title: Bind strong bond with nature as tied 'environmental rakhi'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.