प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:30 AM2021-02-25T01:30:11+5:302021-02-25T01:30:26+5:30

राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार; मराठवाडा विकासाचा ध्यास घेऊन आठ दशके केले कार्य

Bhishmapitamah Bhujangrao Kulkarni of the administration passed away due to old age | प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यातील वयाने आणि अनुभवाने सर्वांत ज्येष्ठ  निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास निधन झाले. ५ फेब्रुवारीला त्यांनी १०४ व्या वर्षात पदार्पण केले होते.राज्याच्या पहिल्या जनगणनेचे प्रमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मुंबईचे महसूल आयुक्त, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिलेदार आणि पुढे दोन वेळा कुलगुरू म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. 

स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समिती सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखा समिती, मराठवाडा ग्रामीण बँक, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले.   
त्यांच्या पश्चात मुलगा पद्माकर कुलकर्णी (अमेरिका), तर मंगला बट्टे (अमेरिका), डाॅ. उषा नांदेडकर या मुली आहेत. घाटीच्या नेत्ररोग विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, शुभदा पाटील, नीरजा कुलकर्णी यांचे ते आजोबा होत. सुना, नातवंडे, पतवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. 

प्रशासकीय सेवेतील पितामह भीष्मास मुकलो-

भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. ‘लोकमत’शी भुजंगरावांचा प्रारंभापासूनच स्नेह राहिला. प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमीच उपयुक्त ठरला. प्रशासकीय सेवेतील ते पितामह भीष्मच होत. हैदराबाद राज्याची प्रशासकीय सेवा, नांदेड, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त, मुंबई महसूल विभागाचे आयुक्त, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक व विविध खात्यांचे सचिव म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

महाराष्ट्राच्या विकासातील असमतोल शोधण्यासाठी स्थापन केलेल्या दांडेकर समितीचे ते सदस्य राहिले. त्यांनी प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष ठेवून अभ्यास केला. त्यांचा ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’ हा ग्रंथ चांगलाच गाजला. अशा एका मोठ्या व्यक्तीस आपण मुकलो. भुजंगराव कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.    - राजेंद्र दर्डा,    एडिटर इन चीफ, लोकमत समूह

Web Title: Bhishmapitamah Bhujangrao Kulkarni of the administration passed away due to old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.