ऑरिकसाठी ‘ढोलेरो’सारखी कनेक्टिव्हिटी असायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:57 PM2019-09-07T13:57:34+5:302019-09-07T14:05:31+5:30

पंतप्रधानांकडून ऑरिकसाठी अपेक्षा 

For Auric, there should be connectivity like Dholero | ऑरिकसाठी ‘ढोलेरो’सारखी कनेक्टिव्हिटी असायला हवी

ऑरिकसाठी ‘ढोलेरो’सारखी कनेक्टिव्हिटी असायला हवी

googlenewsNext
ठळक मुद्देविमानतळ विस्तारीकरण, ऑटोमोबाईल्स अँकर प्रोजेक्ट आणि पर्यटनवृद्धीचा विचार व्हावाउद्योगांची मरगळ दूर होईल, असे काही मिळावेउद्योग आणि पर्यटनवाढीबाबत अपेक्षा

- विकास राऊत

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल-कॉरिडॉरमधील शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कअंतर्गत विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीच्या प्रशासकीय इमारतीतील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन शनिवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्यातील आणखी खूप कामे बाकी आहेत; परंतु पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यामुळे उद्योग वर्तुळातून अनेक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 

पंतप्रधान ऑरिक आणि महिला बचतगट मेळाव्याच्या अनुषंगाने येथे येत आहेत. त्यामुळे ते उद्योगांच्या अनुषंगाने काही तरी बोलतील, अशी प्रतिक्रिया उद्योजकांतून उमटली आहे. गुजरातमधील अहमदाबादनजीक असलेल्या ढोलेरो डीएमआयसीच्या नोडमध्ये आहे. ढोलेरोच्या धर्तीवर आॅरिक सिटीला कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी नियोजनाची गरज उद्योजकांनी व्यक्त केली आहे. ढोलेरोमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आॅरिकच्या तुलनेत चांगले आहे. तशीच गुंतवणूक ऑरिकमध्ये होण्याची अपेक्षा आहे. 

त्याच धर्तीवर ऑरिकचा विचार व्हावा
मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी म्हणाले, औरंगाबाद म्हणून पंतप्रधानांकडून अपेक्षा तर खूप आहेत. बोलायचेच म्हटले तर आॅरिकच्या कक्षा रुंद करताना मोठा विचार होणे आवश्यक आहे. 
ढोलेरोचा आढावा घेतला तर लक्षात येते त्यांचे नियोजन २०४० पर्यंत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, ढोलेरो ते अहमदाबाद सहापदरी महामार्ग, मेट्रो, सोलार एनर्जीबद्दल तेथे विचार केलेला आहे. त्याच धर्तीवर ऑरिकचा विचार होणे गरजेचे आहे. 
औरंगाबाद ते जालना सहा पदरी महामार्ग व्हावा. शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज मेट्रोचे नियोजन करावे. विमानतळाची धावपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची करणे. २० वर्षांसाठी दूरगामी आराखडा तयार करायला हवा. आॅटोमोटिव्ह उद्योगांनी मंदीमुळे मार खाल्ला आहे. त्यामुळे उद्योगांचा जीएसटी २८ टक्क्यांवरून कमी करण्याची घोषणा जर पंतप्रधानांनी केली तर उद्योगांसाठी ते फायद्याचे ठरेल. 

उद्योगांची मरगळ दूर होईल, असे काही मिळावे
मसिआ या लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे म्हणाले, पंतप्रधानांकडून उद्योगांना खूप अपेक्षा आहेत. त्यांनी शनिवारी उद्योगांवर आलेली मरगळ दूर होईल, असे काही तरी घोषित करावे, ही अपेक्षा आहे. 
गुंतवणुकीबाबत बोलायचे झाले तर एफडीआय महाराष्ट्रात येते; परंतु औरंगाबादमध्ये येत नाही. एफडीआय औरंगाबादमध्ये येण्यासाठीची धोरणे पंतप्रधानांनी ठरविण्याचा विचार करावा. डीएमआयसीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दिले हे ठीक आहे; परंतु तेथे मोठे उद्योग आले नाही तर काय करणार. 
लघु उद्योगांची साखळी मोठी व्हावी, यासाठी अँकर प्रकल्प येण्याची गरज आहे. किया मोटार्ससारखा उद्योग आॅरिकमध्ये आला असता तर येथील उद्योगांना मोठी चालना मिळाली असती. त्यामुळे पंतप्रधान शनिवारी गुंतवणुकीबाबत दमदार घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.

उद्योग आणि पर्यटनवाढीबाबत अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅरिकच्या उद्घाटनानिमित्त येणार असल्यामुळे त्यांच्याकडून काही तरी घोषणा झाली तर आनंदच होईल. पर्यटन आणि उद्योग वाढीबाबत ते काही तरी देतील, अशी अपेक्षा उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केली. 
ते म्हणाले, जीएसटी सोडला तर बाकीचे मुद्दे हळूहळू मार्गी लागत आहेत. भारत स्टेज क्र.४ च्या वाहनांना देखील २०२१ पर्यंत सवलत मिळणार आहे. उत्पादन २०२० मध्ये बंद झाले तरी पुढील नऊ महिने वितरकांना वाहने विक्री करून त्याची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा महत्त्वाची आहे. तसेच १५० च्या दुचाकींबाबत सरकारचे धोरण मवाळ झाले आहे. 
औरंगाबादसाठी महत्त्वाचे म्हणजे विमानतळ विस्तारीकरण आणि दळणवळण महत्त्वाचे आहे. आयटी इंडस्ट्रीसाठी विमानसेवा महत्त्वाची आहे. पुणे-बंगळुरू विमानसेवेमुळे आयटीला चालना मिळाली आहे. येथे आयटी इंडस्ट्रीमध्ये १५०० कर्मचारी आहेत. पंतप्रधानांनी विमानसेवेबाबत केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले, तरी फायदा होणे शक्य आहे. 

Web Title: For Auric, there should be connectivity like Dholero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.