औरंगाबाद-शिर्डीच्या 'सुपर एक्स्प्रेस वे'वर दिल्लीत चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 07:32 PM2020-02-21T19:32:08+5:302020-02-21T19:34:24+5:30

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बोलावली विशेष बैठक

Aurangabad-Shirdi 'Super Express Way' discusses in Delhi | औरंगाबाद-शिर्डीच्या 'सुपर एक्स्प्रेस वे'वर दिल्लीत चर्चा 

औरंगाबाद-शिर्डीच्या 'सुपर एक्स्प्रेस वे'वर दिल्लीत चर्चा 

googlenewsNext
ठळक मुद्दे भाविकांना शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी खड्ड्यांमुळे तीन तासांचा कालावधी लागतो

औरंगाबाद : औरंगाबाद- शिर्डी सुपर एक्स्प्रेस रस्ता करावा, ही खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत लावून धरलेली मागणी व त्यानंतर त्यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात दिल्लीत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाने कळविले आहे. 

केवळ देशातील नव्हे, तर जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येतात; परंतु औरंगाबादहून शिर्डीला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्ता असून, भाविकांना अवघ्या तासाभराच्या अंतरासाठी तब्बल तीन तासांचा प्रवास करावा लागतो. भाविकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी औरंगाबाद ते शिर्डी हा रस्ता सुपर एक्स्प्रेस-वे करावा, अशी मागणी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना यासंबंधीचा प्रस्तावही सादर केला होता.

यासंदर्भात नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून खा. जलील यांना ३ फेब्रुवारी रोजी पत्र मिळाले आहे. त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, देशभरात अनेक राज्यांमध्ये फास्ट ट्रॅक हायवे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले असून, बहुतांश सर्वच ठिकाणी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. या कामांना आणखी गती देण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल व त्यात आपल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जाईल. त्या बैठकीस खा. इम्तियाज जलील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. 

तथापि, महाराष्ट्रातील शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान म्हणून ओळखले जाते. औरंगाबादमार्गे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी खड्ड्यांमुळे तीन तासांचा कालावधी लागतो. हा रस्ता सुपर एक्स्प्रेस-वे केल्यास औरंगाबादहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होईल. त्यांचा वेळ आणि पैसाही वाचेल.

या शहरातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा खासदार जलील यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अद्याप कोणताही प्रस्ताव अथवा त्या अनुषंगाने चाचपणी करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले.

आपला हा ड्रीम प्रोजेक्ट असेल
यासंदर्भात खा. इम्तियाज जलील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘औरंगाबाद-शिर्डी सुपर एक्स्प्रेस-वे’ हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने  २०१७ मध्ये हा रस्ता द्विपदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.४त्यास आपण विरोध केला होता. हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, तो द्विपदरी नव्हे, तर तो सुपर एक्स्प्रेस-वे केला जावा, अशी मागणी करीत आपण तो प्रस्ताव थांबविला होता. हाच धागा पकडत आपण नितीन गडकरी यांच्या विभागाकडे याबाबत प्रस्ताव सादर केला. या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल.

Web Title: Aurangabad-Shirdi 'Super Express Way' discusses in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.