महापालिकेकडून प्रभागांची जुळवाजुळव सुरू; राजकीय मंडळीही सक्रिय, सोयीनुसार प्रभाग हवाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:24 PM2022-05-21T19:24:17+5:302022-05-21T19:24:37+5:30

महापालिकेने तयार केलेला प्रभाग आराखडा योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे आहे.

Aurangabad Municipalities start matching wards; Political parties are also active | महापालिकेकडून प्रभागांची जुळवाजुळव सुरू; राजकीय मंडळीही सक्रिय, सोयीनुसार प्रभाग हवाय

महापालिकेकडून प्रभागांची जुळवाजुळव सुरू; राजकीय मंडळीही सक्रिय, सोयीनुसार प्रभाग हवाय

googlenewsNext

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली. या कामात प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत असली तरी काही माजी पदाधिकारी, नगरसेवक अधिक सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोयीनुसार वॉर्ड, प्रभाग कसा करता येईल याची चाचपणी त्यांच्याकडून केली जाते आहे.

निवडणूक आयोगाने १७ मे रोजी सायंकाळी महापालिकेला शहराचा नकाशा दिला. त्याच दिवशी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बैठक घेऊन निवडणूक विभागाला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. बुधवार, १८ मेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. आयाेगाने विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार वॉर्ड, प्रभाग तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक वॉर्डातील लोकसंख्येचा निकष पडताळून पाहण्यात येतोय. प्रत्येक प्रभागाच्या सीमा ठरविण्याचे काम सुरू झाले. कच्च्या स्वरूपात सध्या काम सुरू आहे. प्रशासक आपल्यासमोर नंतर अंतिम प्रभाग तयार करतील. या प्रक्रियेला किमान सहा ते सात दिवस अपेक्षित आहेत.

डिसेंबर २०२१ मध्येही महापालिकेने प्रभाग आराखडा तयार केला होता. नंतर हा आराखडा आयोगाने रद्द केला. आता नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील अनुभव डोळ्यांसमोर ठेवून प्रशासन कामाला लागले. सोयीनुसार वॉर्ड, प्रभाग कसा करता येईल, यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे काही नगरसेवक बरेच सक्रिय झाले आहेत.

चुकीचे केल्यास न्यायालयात जाणार
महापालिका प्रशासनाने कितीही चांगला प्रारूप प्रभाग आराखडा तयार केला तरी अनेकांना तो पटणार नाही. शिवसेनेच्या सोयीसाठी आराखडा तयार केल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ शकतो. या प्रक्रियेला न्यायालयात आवाहन देण्याची तयारीही काही राजकीय मंडळींनी आतापासूनच सुरू केली आहे.

आयोग आराखडा अंतिम करणार
महापालिकेने तयार केलेला प्रभाग आराखडा योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे आहे. त्यात सुधारणा करण्याचे कामही आयोगाचे आहे. आयोगाकडून आराखडा अंतिम झाल्यावर तो प्रसिद्ध करण्यात येईल. सोबतच सूचना, हरकती मागविण्यात येतील.

आयोगाने दिलेली लोकसंख्या
एकूण- १२,२८,०३२
अनुसूचित जाती- २,३८,१०५
अनुसूचित जमाती- १६,३२०
एकूण वॉर्ड- १२६
एकूण प्रभाग- ४२
एका वॉर्डची लोकसंख्या - ९,७४८
 

Web Title: Aurangabad Municipalities start matching wards; Political parties are also active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.