कॉलनी सोडून जाण्यासाठी कोरोना योद्धा परिचारिकेच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 04:45 PM2020-05-12T16:45:34+5:302020-05-12T16:50:05+5:30

चिकलठाणा येथील परिचारिकेच्या घरातील घटना 

Attempt to attack Corona Warrior nurse's home to leave the colony | कॉलनी सोडून जाण्यासाठी कोरोना योद्धा परिचारिकेच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

कॉलनी सोडून जाण्यासाठी कोरोना योद्धा परिचारिकेच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्री पिण्यास पाणी मागून दरवाजा उघडण्याचा बहाणा शिवीगाळ करून दारावर लाथा मारल्या 

औरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटीच्या कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या कोरोना योद्धा परिचारिकेने कॉलनीत राहू नये याकरिता तेथील ५ ते ६ रहिवाशांनी  त्यांच्यासह पतीला शिवीगाळ करून रविवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा  प्रयत्न केला.  प्रसंगावधान राखून त्यांनी दार आतून लावून घेत पोलिसांना फोन केल्याने हे कुटुंब वाचले. ही घटना रविवारी मध्यरात्री चिकलठाणा येथील माळी गल्लीत घडली. 

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात शिल्पा हिवाळे या परिचारिका आहेत. त्या चिकलठाणा येथील माळी गल्लीत ११ वर्षीय मुलगा आणि पतीसोबत भाड्याने राहतात. चिकलठाणा येथेही कोरोनाचा संसर्ग असलेला रुग्ण आढळून आला आहे. हिवाळे या कोरोना मिनी घाटीतील कोरोना वॉर्डात काम करतात. ही बाब तेथील रहिवाशांना समजली.  त्यांनी हिवाळे कुटुंबाने कॉलनी सोडून दुसरीकडे राहायला जावे यासाठी त्यांना विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही येथे राहू नका, आमच्या घरात म्हातारी माणसे आणि लहान मुले आहेत, तुमच्यामुळे कॉलनीतील लोकांना कोरोनाचा धोका आहे, असे अप्रत्यक्षरीत्या बजावले. रुग्णालयापासून जवळच खोली असल्याने नर्स हिवाळे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ८ दिवसांपूर्वी कॉलनीत घराजवळ उभ्या त्यांच्या कारच्या चारही चाकांची हवा सोडून देण्यात आली. यानंतर  कारचे इंडिकेटर फोडून नुकसान करण्यात आले. याकडेही हिवाळे दाम्पत्याने कानाडोळा केला.

रविवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर शिल्पा जेवण करून झोपल्या. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराची खिडकी उघडी होती. त्यावेळी कुणीतरी खिडकीतून वारंवार डोकावत असल्याचे हिवाळे यांच्या पतीला दिसले. त्यांनी कोण आहे असे विचारल्यानंतर ‘पाणी प्यायला द्या, दार उघडा’ असे बाहेरील अनोळखी माणसाने त्यांना सांगितले. हिवाळे यांनी दार उघडताच आरोपींनी त्यांना अश्लील शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी पाच ते सहा लोक अंधारात उभे दिसले. त्यांना पाहून घाबरलेल्या शिल्पा  यांनी जोरात दार आतून बंद केले. बाहेर उभ्या लोकांनी शिव्या देत दारावर लाथा मारण्यास सुरुवात केली.  १० मिनिटे हे लोक त्यांना शिव्या देऊन धमकावत होते.

पोलिसांना फोन केल्याने बचावले 
घाबरलेल्या हिवाळे यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. यानंतर त्यांच्या मदतीला तात्काळ पोलीस आले. पोलीस आल्याचे पाहून टोळके तेथून पळून गेले. यानंतर हिवाळे या पती आणि मुलासह एमआयडीसी सिडको ठाण्यात गेल्या. तेथे त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

घाबरून गेलो आहोत 
माझा ११ वर्षांचा मुलगा आजारी आहे. असे असताना रुग्णालयात कोरोना वॉर्डात काम करते. माझ्यामुळे कॉलनीतील लोकांना संसर्ग होणार नाही, ही बाब मी तेथील लोकांना सांगितली. यानंतरही हे लोक मला त्रास देत आहेत. रात्रीच्या घटनेपासून आम्ही खूप घाबरून गेलो. आरोग्य विभागाने सरकारी कर्मचारी निवासस्थान उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती सिव्हिल सर्जन आणि आरोग्य उपसंचालक यांना केली आहे. 
- शिल्पा हिवाळे, परिचारिका, जिल्हा सामान्य रुग्णालय 


मलाच सुरक्षा नाही, त्यांना कशी देऊ? 
रुग्णालयात आणण्याची व्यवस्था करता येईल, रुग्णालयात संरक्षण देऊ शकतो किंवा त्यांना विरोधामुळे येता येत नसल्यास त्यांचा पगार कापला जाणार नाही. एवढेच माझ्या हातात आहे. हे मी त्यांना समजावून सांगितले आहे. इथे मलाच सुरक्षा नाही, तर मी कशी त्यांना रुग्णालयाबाहेर सुरक्षा देणार? 
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Attempt to attack Corona Warrior nurse's home to leave the colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.