पर्यटन व वारसा स्थळे उघडण्याचा एएसआयचे आदेश, मात्र अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 07:12 PM2021-06-15T19:12:24+5:302021-06-15T19:16:48+5:30

पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

ASI orders to open tourist and heritage sites, but final decision will be taken by the Collector | पर्यटन व वारसा स्थळे उघडण्याचा एएसआयचे आदेश, मात्र अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार

पर्यटन व वारसा स्थळे उघडण्याचा एएसआयचे आदेश, मात्र अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा उघडण्याचा आदेश  विभागीय कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार

औरंगाबाद : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अंतर्गत असलेली ऐतिहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच संबंधित पर्यटन स्थळे उघडण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे पुरातत्त्व अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर या ऐतिहासिक वास्तू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. एएसआयच्या वास्तू विभागाचे संचालक एन. के. पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, १६ जूनपासून एएसआयच्या अंतर्गत असलेली सर्व स्मारके, पुरातन स्थळे सुरू करण्यात यावीत, ही स्मारके, पुरातन स्थळे सुरू करताना संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे. यानुसार एएसआयच्या औरंगाबाद मंडळाचे पुरातत्त्व अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ११ जून रोजी पत्र पाठविले आहे. या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत ऐतिहासिक वास्तू उघडण्याविषयी निर्णय घेण्यासाठी चर्चा केल्याची माहिती संबंधितांनी दिली.

एएसआयचे पत्र मिळाले
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पर्यटन स्थळे उघडण्याविषयीचे पत्र मिळाले आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.
- सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
आमच्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच उघडण्यात येतील. ताेपर्यंत आम्हांला काेणताही निर्णय घेता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.
- डाॅ. मिलन कुमार चावले, पुरातत्त्व अधीक्षक, औरंगाबाद मंडळ एएसआय

आम्हाला कोणत्याही सूचना नाहीत
राज्य पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहण्यासाठी उघडण्याचा निर्णय हा राज्यस्तरावरून घेतला जातो. अद्यापर्यंत आम्हांला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त झाल्यास त्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.
- अजित खंदारे,सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा
औरंगाबादेतील पर्यटन स्थळे उघडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. एएसआयने पर्यटनस्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतल्यास पर्यटनस्थळे उघडतील. पर्यटनस्थळे उघडल्यानंतर अनेकांचा गेलेला रोजगार पुन्हा परत मिळणार आहे. पर्यटनस्थळे उघडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे आता विमान आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
- सुनित कोठारी, उद्योजक तथा अध्यक्ष, एटीडीएफ
 

Web Title: ASI orders to open tourist and heritage sites, but final decision will be taken by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.