बंदिजनांच्या हातून साकारले विघ्नहर्त्याचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:33 PM2019-08-23T15:33:18+5:302019-08-23T15:35:28+5:30

हर्सूल कारागृहात बंदीजनांनी दोन महिन्यांत बनविल्या शाडूच्या ५० मूर्ती

The appearance of a Ganesha in the hands of detainees from Hersul jail | बंदिजनांच्या हातून साकारले विघ्नहर्त्याचे रूप

बंदिजनांच्या हातून साकारले विघ्नहर्त्याचे रूप

googlenewsNext
ठळक मुद्देबंदिजनांना दिलेले प्रशिक्षण फलद्रूप

औरंगाबाद : क्षणिक क्रोधातून त्यांच्या हातून जे अघटित घडले त्याची शिक्षा ते भोगतच आहेत. पण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप व्यक्त करून बंदिजनांनी गणरायाच्या मूर्ती साकारल्या. वाल्याचा वाल्मिकीपर्यंतचा हा प्रवास करणाऱ्या हर्सूल कारागृहातील ५ बंदिजनांनी अन्य बंदिजनांसमोर आदर्श निर्माण केला. इतिहासात पहिल्यांदाच या कारागृहात मूर्ती तयार करण्यात आल्या. अस्सल मूर्तिकाराप्रमाणे या बंदिजनांनी शाडूच्या मातीतून विघ्नहर्त्याचे रूप साकारले. 

हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदिजन आपल्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा भोगत आहेत. या बंदिजनांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण व्हावे व शिक्षा भोगल्यानंतर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करावा. ही शासनाची संकल्पना. यातूनच बंदिजनांना त्यांच्या आवडीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. 

काही महिन्यांपूर्वी नाशिक कारागृहातून हर्सूल कारागृहात काही कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले. त्यातील एक मूर्तिकार होता. त्याने येथे कारागृह अधीक्षकांकडे गणेशमूर्ती तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास प्रशासनाने परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्या बंदिजनाने अन्य ४ बंदिजनांनाही सोबत घेऊन त्यांनाही मूर्ती बनविण्याचे शिकविले. असे म्हणतात की, बालगणेशाची मूर्ती साकारताना या बंदिजनांची ब्रह्मानंदी टाळी लागत असे. ते तल्लीन होऊन जात. त्यांनी बालगणेशासोबतच शिव-पार्वती गणेश, नंदीवर विराजमान झालेला गणपती, शाही आसनावर बसलेले गणराया, जास्वंदावरील गणराया, फेटा घातलेला गणेश, अशा विविध ५० मूर्ती मागील दोन महिन्यांत तयार करण्यात आल्या. त्याही शाडूच्या मातीचा वापर करून. बंदिजनांच्या हातून साकारलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन आजपासून कारागृहाच्या बाहेरील जटवाडा रोडवर भरविण्यात आले. 

जेव्हा कारागृहातून मूर्ती विक्रीसाठी नेण्यात येत होत्या तेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दुरावत आहे, अशा भावना त्या बंदिजनांमध्ये निर्माण झाल्या होत्या. उद्घाटनापूर्वीच मूर्ती पाहण्यासाठी मंडपात गर्दी झाली होती. प्रत्येक जण या मूर्ती निरखून पाहत होते. रिक्षाचालकांना मोह अवरता आला नाही. तेही रिक्षा बाजूला लावून मूर्ती न्याहाळताना दिसून आले. 

मोदी जाकीटचे आकर्षण 
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बनविण्यात आलेल्या वस्तूंचे व मूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ५  वाजता उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते झाले. यावेळी अधीक्षक हिरालाल जाधव, वरिष्ठ जेलर अविनाश गोसावी यांची उपस्थिती होती. शिवणकाम निदेशक उत्तम पाटील व एम. एस. वनवे यांनी सांगितले की, २५ बंदिजन शिवणकाम शिकले आहेत. त्यांनी मोदी जाकीट बनविण्यात मास्टरकी मिळविली आहे. हेच या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. याशिवाय दरी, सतरंज्या, चादर, टॉवेल, रुमालही ठेवण्यात आले आहे. 

Web Title: The appearance of a Ganesha in the hands of detainees from Hersul jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.