देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 07:27 PM2020-02-22T19:27:27+5:302020-02-22T19:31:22+5:30

मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत राबविणार उपक्रम, एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

'Amazing Aurangabad' for foreign investors will run by state goverment | देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार

देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार

googlenewsNext
ठळक मुद्देउद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपक्रम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ‘अमेझिंग औरंगाबाद’ हा अनोखा उपक्रम राज्य शासनाच्या उद्योग विभाग, मसिआ, सीएमआय संघटनेच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे. देश-विदेशांतील गुंतवणूकदारांना औरंगाबादकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत काल गुरुवारी उद्योजक संघटनांच्या बैठकीत व्यक्त केला.

‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रमाबाबत गुरुवारी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सीएमआयएचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया, उपाध्यक्ष कमलेश धूत, तसेच उद्योजक मधुसूदन अग्रवाल, प्रकाश जैन, सुनील किर्दक, नंदकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते. या बैठकीत ‘अमेझिंग औरंगाबाद’ या उपक्रमाबाबत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. याशिवाय सीएमआयए, मसिआ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत काल झालेल्या या बैठकीत वीज दरवाढ आणि उद्योगांसंबंधीच्या काही मागण्यांबाबत उद्योगमंत्री देसाई यांच्यासोबत चर्चा केली.

भविष्यात औरंगाबाद हे विकास केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. औरंगाबादमध्ये आयटी, आॅटोमोबाईल तसेच पर्यटन क्षेत्रात विशेष काम करण्याची संधी आहे. आॅरिक, दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) देश-विदेशांतील अनेक कंपन्या येथे दाखल झाल्या आहेत. औरंगाबाद अमेझिंग या उपक्रमामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार येथे येतील, असा विश्वास उद्योजकांनी यावेळी व्यक्त केला.

वेरूळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे चीन, जपान येथील पर्यटक, तसेच गुंतवणूकदारांना औरंगाबादकडे आकर्षित केले जाईल. उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. जपान, कोरिया, थायलंड, मॅनमार, सिंगापूर, तसेच श्रीलंका आदी देशांना सोबत घेऊन औरंगाबादेत बुद्धिस्ट सर्किट स्थापन केल्यास गुंतवणूकदार आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपक्रम
या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचे उद्योग विभागाचे उद्दिष्ट आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा उपक्रम सुरू करण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, या उपक्रमाच्या नियोजनासाठी पुन्हा येत्या ५ मार्च रोजी बैठक आयोजित केली जाणार आहे.

Web Title: 'Amazing Aurangabad' for foreign investors will run by state goverment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.