धांडोळा अजिंठ्याचा...जाणून घ्या अजिंठा लेणीची शोधयात्रा

By सुधीर महाजन | Published: May 4, 2019 08:26 PM2019-05-04T20:26:41+5:302019-05-04T20:33:38+5:30

ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिका-याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्षांपूर्वी म्हणजेच २८ एप्रिल १८१९ हाच तो दिवस. 

Ajantha caves ... Learn about the journey of Ajanta Caves | धांडोळा अजिंठ्याचा...जाणून घ्या अजिंठा लेणीची शोधयात्रा

धांडोळा अजिंठ्याचा...जाणून घ्या अजिंठा लेणीची शोधयात्रा

googlenewsNext

-सुधीर महाजन

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या शोधाला दोनशे वर्षे पूर्ण झाली. २८ एप्रिल १८१९ रोजी जॉन स्मिथ नावाचा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि लेणी क्र. १० ची दर्शनीभागाची सूर्यकमान त्याच्या दृष्टीस पडली. ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात. तो पर्यंत हा अमूल्य ठेवा जगाच्या दृष्टीने अज्ञात होता. जवळपास दीड हजार वर्षे तो अज्ञात राहिला; परंतु स्थानिकांना या लेण्यांची माहिती होती; पण महत्त्व कळले नव्हते. शेजारचे माथ्यावरचे लेणापूर हे गाव, तर लेण्यांच्या निर्मिकांची वस्तीच; पण कालौघात बुद्ध धर्माची पीछेहाट झाली आणि हा ठेवा अज्ञातात ढकलला गेला. अजिंठा हे गाव लेणीपासून १० कि़ मी. अंतरावर या नावाचाही एक इतिहास असावा. ‘महामायुरी’या चौथ्या शतकातील ग्रंथामध्ये बौद्ध तीर्थस्थळांच्या यादीत ‘अजिंत जय’ या गावाचा उल्लेख आहे. दुसरा अंदाज या लेणीला ‘अचित्य’या बौद्ध भिक्खूचा विहार म्हणतात. यावरून अजिंठा नाव असावे, असा अंदाज केला जातो. 

इतकी वर्षे ही लेणी अज्ञात राहिली. कारण बौद्ध धर्माची पीछेहाट झाल्यानंतर येथे वस्ती नव्हती. घनदाट जंगलामुळे ती लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञात राहिली. देशातील १२०० पैकी तब्बल हजार लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. खºया अर्थाने ‘बुद्धिस्ट सर्किट’ येथेच पूर्ण होते. नाशिक, पितळखोरा, घटोत्कच, भोगवर्धन (भोकरदन) तेर, प्रतिष्ठान (पैठण), जुन्नर, नालासोपारा हा त्या काळचा व्यापारी मार्ग त्यावर ठायी ठायी असलेल्या लेण्या, बुद्धविहार असा हा क्रम. या सगळ्या लेण्यांचा काळही वेगळा. भाजेंपासून लेणी खोदण्याची सुरू झालेली परंपरा पुढे, तर वेरूळमध्ये हिंदू, जैन, बौद्ध अशा सगळ्याच धर्माच्या लेण्यांचा समूह दिसतो. 
जॉन स्मिथने लेणीचा शोध लावल्यानंतर पुढे २४ वर्षे तेथे काही काम झाले नाही; पण ब्रिटिशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले. त्यावर अभ्यास झाला. पुढे १८४४ साली. ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली. गिल हा सैनिकगडी असला तरी मोठा चित्रकार होता एका अर्थाने अजिंठ्याच्या कलेला पारखी मिळाला. त्याने लेणीची अवस्था पाहिली. झाडे-झुडुपे, वटवाघळांची वस्ती, वानरांचा वावर त्याने एक  एक गुफा स्वच्छ करायला सुरुवात केली, एक एक खजिना त्याच्यापुढे उघडायला लागला आणि त्याने त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली. 

रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेमकहाणी अजिंठ्याच्या अविभाज्य भाग झाली. गिलने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन इंग्लंडमध्ये आयोजित केले; पण त्यापूर्वीच ही चित्रे भस्मसात झाली; परंतु तो पर्यंत आधुनिक कला जगतात अजिंठ्याचे नाव पसरले होते. शेकडो वर्षांचा अज्ञातवास संपला होता. अजिंठ्याला जागतिक पटलावर नेणारा कॅप्टन गिल आजही भुसावळच्या ख्रिस्त स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे. 
१८५७ च्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अमल सुरू झाला आणि अजिंठ्याचे भाग्य उजळले. एशियाटिक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला. १८७२ साली. जे.जे. स्कूलचे प्राचार्य जॉन ग्रिफिथ्स   यांनी विद्यार्थ्यांकडून येथे चित्रे काढून घेतली. त्यांचा अजिंठ्यावरचा दुर्मिळ चित्रग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गं्रथालयात आहे. जगभरात केवळ तीन प्रती या ग्रंथाच्या असल्याने त्याचे मोल कळते. १८९६ साली त्यांचे ह्यळँी स्रं्रल्ल३्रल्लॅ२ ्रल्ल ३ँी इ४ििँ्र२३ ूं५ी ३ीेस्र’ी ङ्मा अ्नंल्ल३ं’ह्ण हे पुस्तक प्रसिद्ध झाले; परंतु त्यांनी काढलेली चित्रे १८८४ साली लंडनच्या आगीत भस्मसात झाली होती. यापूर्वी रॉबर्ट गिलने काढलेली पेटिंग्जसुद्धा आगीत नष्ट झाल्या. पुढचा इतिहास सगळा ज्ञात आहे. आज अजिंठा जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेला आहे.
----------------------
एप्रिलमध्ये ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाºयाने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्षांपूर्वी म्हणजेच २८ एप्रिल १८१९ हाच तो दिवस. 
----------------------
तत्कालीन संस्कृती जशीच्या 
तशी डोळ्यासमोर उभी करणारी लेणी
अजिंठा लेण्यांमध्ये स्त्रीसौंदर्य आणि स्त्रीप्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वद्ध, यक्ष-किन्नर, पशुपक्षी, वृक्ष-लता-फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे दर्शनही या लेणीत होते. त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहते.  
---------------------
५०० वर्षे पडला खंड 
इ.स. पूर्व २०० च्या सुमारास लेणी खोदण्यास सुरुवात झाली. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी ही सुरुवात केली. सातवाहन काळात लेणी क्रमांक ८, ९, १०, १२, १३ आणि १५चे खोदकाम झाले. पुढे पाचशे वर्षे काम बंद पडले. पुन्हा पाचव्या शतकात गुप्त, वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तेथील लेणींचे खोदकाम केले. वाकाटक काळात लेणी क्रमांक १, २, १६, १७ आणि १९चे खोदकाम झाले.  
--------------
३० पिढ्या राबल्या; नाव एकाचेही ठाऊक नाही
इ.स. पूर्व दोनशे ते इ.स. सातशे म्हणजे सुमारे नऊशे वर्षांच्या कालखंडात सिद्धहस्त कलाकारांच्या किमान ३० पिढ्या अखंड राबल्या असतील. त्यातील एकाचेही नाव इतिहासात सापडत नाही. देशात साधारण १,२०० लेण्या आहेत. 
------------------
1824 साली जनरल सर जेम्स अ‍ॅलेक्झांडर यांनी अजिंठ्यास भेट दिली आणि १८२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीत आपला अहवाल सादर केला. 
1844 साली कोर्ट आॅफ डायरेक्टर्स आॅफ 
ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या या खजिन्यावर नेमणूक झाली. अजिंठ्याच्या या निसर्गसौंदर्यात रॉबर्ट रमला. ‘पारू’ नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला. त्याने तिच्याशी लग्नही केले. 
1856 साली पारू मरण पावली. पुढे या दोघांची प्रेमकहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली. पारूच्या समाधीवर गिलने लिहीलेला ‘टू द मेमरी आॅफ पारू व्हू डाईड आॅन २३ मे १८५६’ हा संदेश आजही आढळतो.
-------------------
‘पारू’ गेली आणि रॉबर्टच्या हातातील ब्रशही गेला  
पारूच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश खाली ठेवून हाती बंदूक घेतली. १८५७ च्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला, लढला; पण तिथेही त्याचे मन रमेना, म्हणून बंड मोडल्यानंतर पुन्हा १८६१ साली त्याने चित्रकलेला वाहून घेतले. १८६४ मध्ये भुसावळ येथे रॉबर्टने अखेरचा श्वास घेतला. 
--------------
28/04/1819 -200-वर्षांपूर्वी शोध लागलेल्या लेणीला रॉबर्ट गिलच्या रुपातून पारखी मिळाला.

Web Title: Ajantha caves ... Learn about the journey of Ajanta Caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.