मृत्यूनंतर ही 'ब्रदर'ने रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; अवयवदानातून तिघांना दिले नवे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 10:38 AM2021-11-14T10:38:44+5:302021-11-14T10:42:03+5:30

दोन वर्षांनंतर शहरात झाले अवयदान : ग्रीन काॅरिडाॅरने मुंबईला गेले हृदय, दोन किडन्यांचे शहरात प्रत्यारोपण, दोघांना दृष्टी

After death, this 'brother' put a smile on the patient's face; Organ donation gave new life to all three | मृत्यूनंतर ही 'ब्रदर'ने रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; अवयवदानातून तिघांना दिले नवे आयुष्य

मृत्यूनंतर ही 'ब्रदर'ने रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; अवयवदानातून तिघांना दिले नवे आयुष्य

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : रुग्णालयात डायलिसिस युनिटमध्ये काम करताना रोज मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांच्या वेदाना अगदी जवळून पाहताना आपणही किडनीदान, अवयवदान करून कोणाच्या तरी वेदना दूर करू, असे सतत म्हणणाऱ्या ब्रदरने हा शब्द अगदी खरोखरच पाळला. ब्रेनडेड झालेल्या ब्रदरचे शनिवारी अवयवदान झाले. ग्रीन काॅरिडाॅरने मुंबईला हृदय पाठविण्यात आले. तर दोन किडन्यांचे शहरातच प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याबरोबर दोघांना दृष्टीदेखील मिळणार आहे.

सचिन बालाजी शिवणे असे या ब्रदरचे नाव आहे. डाॅ. हेडगेवार रुग्णालयातील डायलिसिस युनिटमध्ये ते कार्यरत होते. डोक्याला मार लागल्याने ११ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर डाॅ. हेडगेवार रुग्णालयातच उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रुग्णालयातील ब्रेन डेड समितीने त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यांच्या नातेवाईकांना अवयदानाविषयी माहिती देण्यात आली. मृत्यूनंतरही अवयदानाच्या माध्यमातून सचिन हे या जगातच राहतील, या विचाराने पत्नी, भाऊ, वडील, सासरे यांनी अवयवदानाला संमती दिली. किडनी प्रत्यारोपण समन्वयक अनिल घोगरे यांनी ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डाॅ. सुधीर कुलकर्णी, विभागीय समन्वयक मनोज गाडेकर यांना माहिती दिली. त्यानंतर अवयवदानाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबईतील ग्लोबल हाॅस्पिटलचे डाॅ. प्रवीण कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने शहरात येऊन विमानाने हृदय नेले. त्यासाठी रुग्णालयापासून तर विमानतळापर्यंत ग्रीन काॅरिडाॅर करण्यात आला होता. विमानतळावर ‘सीआयएसएफ’च्या जवानांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या तयारीची डाॅ. उन्मेष टाकळकर यांनी माहिती दिली.

परिचारिका, ब्रदरच्या भावना अनावर
रोज रुग्णालयात रुग्णसेवा देणारा सोबती आपल्यातून निघून गेला, या विचाराने रुग्णालयातील परिचारिका, ब्रदर यांना भावना अनावर झाल्या होत्या. २८ ऑगस्ट २०१९ रोजी मराठवाड्यात अवयवदान झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे ब्रेक लागला होता. मात्र दोन वर्षांनंतर २६ वे अवयवदान झाले. कोरोना प्रादुर्भावानंतरचे हे पहिले अवयवदान ठरले.


यांनी घेतले परिश्रम : प्रत्यारोपणासाठी डाॅ. रेणू चव्हाण, डाॅ. विनोद शेटकार, डाॅ. महेश देशपांडे, डाॅ. अष्टपुत्रे, डाॅ. श्रीकांत देशमुख, डाॅ. पिनाकीन पुजारी, डाॅ. रजनीकांत जोशी, डाॅ. नीरज इनामदार, डाॅ. अंजली कुलकर्णी, डाॅ. सुप्रिया कुलकर्णी, डाॅ. मिलिंद कुलकर्णी, सुधीर देशपांडे, सीईओ डाॅ. राजश्री रत्नपारखे, सीओओ प्रवीण ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: After death, this 'brother' put a smile on the patient's face; Organ donation gave new life to all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.