अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो : फूड पार्कच्या घोषणेमुळे अन्न प्रक्रिया उद्योग आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:10 PM2020-01-11T13:10:23+5:302020-01-11T13:12:01+5:30

प्रक्रिया उद्योगाच्या मशिनरीची माहिती घेण्यात उद्योजकांसह नागरिकांना रस

Advantage Maharashtra Expo: Food processing industry attracts due to announcement of food Port | अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो : फूड पार्कच्या घोषणेमुळे अन्न प्रक्रिया उद्योग आकर्षण

अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो : फूड पार्कच्या घोषणेमुळे अन्न प्रक्रिया उद्योग आकर्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी फूड पार्कची केली होती घोषणा

औरंगाबाद : पैठणपाठोपाठ आता बिडकीन येथे फूड पार्क उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि सर्वांमध्ये फूड पार्कबदलची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता प्रचंड वाढली. त्याची प्रचीती कलाग्राम येथे सुरू असलेल्या अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोमध्ये येत आहे. 

मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (मसिआ)तर्फे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कलाग्राममध्ये ‘अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’ भरविण्यात आले आहे. यात ८ पैकी १ असलेला ‘जी’ डोम हा ‘फूड अ‍ॅन्ड फूड प्रोसेसिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग’ आधारित आहे. याआधी १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये रोजी पैठण येथील धनगाव येथे ११० एकरांमध्ये पैठण फूड पार्क सुरू करण्यात आले होते. ५० कोटींची गुंतवणूक व ५०० जणांना रोजगार मिळाला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार डीएमआयसींतर्गत उभारण्यात येणाऱ्या बिडकीन इंडस्ट्रियल पार्क येथे ५०० एकरांवर ‘अन्न प्रक्रिया केंद्र’ (फूड पार्क) उभारण्यात येणार आहे. तसेच भूमिपूजन जून २०२० मध्ये करण्यात येणार असल्याचीही घोषणा करून टाकण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी आणि मालाला योग्य तो मोबदला मिळावा, तसेच देशात अन्नधान्य, फळ, भाजीपाल्याचे होणारे नुकसान कमी होण्यासाठी देशभरात फूड पार्क उभारण्यात येत आहे. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पोमध्ये येणाऱ्या नागरिकांचा कल ‘फूड अ‍ॅण्ड फूड प्रोसिसिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग’च्या स्टॉलकडे सर्वात जास्त दिसून येत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असो कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी असो कि उद्योजक सर्वांमध्ये फूड पार्कबद्दल तेथील उद्योगांना लागणाऱ्या यंत्रसामग्रीबदल अधिकची माहिती जाणून घेण्यासची उत्सुकता दिसून आली. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य लोकही याच ‘जी’ डोममधील प्रत्येक स्टॉलची माहिती घेत अधिक काळ घालवत असल्याचे दिसून आले. अन्न प्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी निगडित अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांची माहितीही या प्रदर्शनात मिळत आहे. पैठण येथे फूड पार्क सुरू झाले असले, तरी याआधीच काही उद्योगांनी बीड असो, शेंद्रा असो येथे अन्नधान्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. तेही यशस्वीपणे उद्योग करीत आहेत. याची माहिती येथे मिळत आहे. 

मराठवाड्यात सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, करडी, जवस, कारळे यांचे उत्पादन घेतले जाते. या तेलबियांवर येथेच प्रक्रिया झाली तर त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल, यादृष्टीने प्रक्रिया उद्योगांची माहिती जाणून घेतली जात होती. याशिवाय येथे मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. 
मक्यावर प्रक्रिया करणारे कोणते उद्योग उभारता येतील, येथील मोसंबी, केशर आंबा, सीताफळ, डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. यावर कशा प्रकारे प्रक्रिया केल्या जाऊ शकतात. त्यावर आधारित कोणते उद्योग सुरू आहेत, याचीही माहिती अनेक नागरिक जाणून घेताना दिसून आले. याशिवाय प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येत आहे. दिवसभरात प्रक्रिया उद्योगावरील स्टॉलला शेकडो लोकांनी भेट दिली. 

शेंद्रा येथील तांदूळ प्रक्रिया उद्योगाची माहिती 
मराठवाड्यातील तांदळावरील पहिला प्रक्रिया उद्योग शेंद्र्यात एलक्राफ्ट हेल्थ अ‍ॅण्ड न्यूट्रिशन प्रा.लि.च्या माध्यमातून अक्ष़य चव्हाण या तरुणाने सुरू केला आहे. देशातील विविध राज्यांतून येणाऱ्या कोलम, कालीमूछ, इंद्रायणी या तांदळावर येथे प्रक्रिया केली जाते.  ग्राहकांच्या आरोग्यासाठी उत्तम असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेमी पॉलिश्ड तांदूळ तसेच पॉलिश न केलेला हातसडीचा तांदूळ म्हणजेच ब्राऊन राईस येथील खासियत ठरत आहे. याशिवाय सेंद्रिय डाळ, सेंद्रिय हळदीचाही समावेश करण्यात आला आहे. याची माहितीही प्रदर्शनात दिली जात आहे. लिंबू आणि कोथिंबीरचे मि़श्रण घातलेला ‘रेडी टू इट राईस’ हे तांदळाचे पाकीट तयार केले जात आहे. पाच- सात मिनिटांत हा तांदूळ शिजतो. कमीत कमी वेळेत पोटभर अन्न या संकल्पनेवर आधारित हे उत्पादन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

आज प्रदर्शनात काय?
शनिवारी सकाळी १०.३० ते १२.१५ दरम्यान युवा उद्योजकता आणि मराठवाडा व महाराष्ट्राचा विकास या विषयावर आ. रोहित पवार आणि आ.संभाजी पाटील निलंगेकर आणि आ. धीरज देशमुख यांचे मनोगत व प्रश्नोत्तरे परिसंवाद होईल. दुपारी १.१५ ते ३.०० वाजेदरम्यान ‘फूड प्रोसेसिंग कॉन्फरन्स’वर पहिले सत्र होईल. यात ‘कृषी व्यवसायातील नवीन वाटा’ या विषयावर विश्वनाथ बोरसे मार्गदर्शन करतील. यानंतर महिला उद्योजक अर्चना कुटे आणि मनीषा धात्रक यांच्यावरील डॉक्युमेंट्री सादर केली जाईल. त्यानंतर ‘द प्रायमरी प्रोसेस आॅफ द फार्मिंग प्रॉडक्ट’ या विषयावर फसिऊद्दीन सय्यद, डॉ. प्रबोध हळदे मार्गदर्शन करतील.

Web Title: Advantage Maharashtra Expo: Food processing industry attracts due to announcement of food Port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.