परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:25 PM2021-03-01T13:25:03+5:302021-03-01T13:29:17+5:30

पेपरची गाडी घेऊन येणारे चालक केंद्र शोधत राहिले, ३ वाजेचा पेपर आला साडेचारला झाला

Admission denied if student arrives late In exam; What about the late arrival of the exam paper? | परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय?

परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय?

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ, संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात आहे.कुठे चालक जेवायला थांबला, तर कोणी ‘जीपीएस’मुळे गोलगोल फिरत राहिला

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरात रविवारी गट-क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात लेखी परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादेत या परीक्षेत एकच गोंधळ पहायला मिळाला. दुपारच्या सत्रातील पेपर चक्क परीक्षा केंद्रांवर ३ ऐवजी तब्बल दीड तास उशिराने साडेचार वाजता पोहोचला. कारण पेपर घेऊन येणाऱ्या वाहनाचा चालक कुठे जेवायला थांबला; तर कोणाची गाडी ‘जीपीएस’मुळे शहरातच गोल फिरत राहिली. या सगळ्याचा परीक्षार्थींना नाहक मनस्ताप सहन करावा लागता. तर थोडा वेळ उशीर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश नाकारण्यात आला. याविषयी एकच संताप व्यक्त केला.

शहरातील संत मीरा विद्यालय येथील केंद्रावर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी परीक्षार्थी दीड वाजताच पोहोचले होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षा होणार होती. परंतु याठिकाणी दुपारी ४.२५ वाजता पुण्याहून पेपर घेऊन गाडी दाखल झाली. यावेळी पालकांनी चालकाला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा जेवण करण्यासाठी थांबल्याचे त्याने सांगितले. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्रावरही दुपारी ३ वाजेऐवजी ४ वाजता पेपर आला. यासंदर्भात पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. असाच प्रकार अन्य केंद्रांवरही झाला. जवळपास तीन तास विद्यार्थी पेपरच्या परीक्षेत ताटकळले.

खाजगी टॅक्सींचा वापर, फक्त चालकच
परीक्षा केंद्रांवर खाजगी टॅक्सींद्वारे पेपर पोहोचविण्यात आले. त्यावर केवळ चालक होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी अथवा अन्य कोणी देखरेखीसाठी कोणीही नव्हते. जेवणासाठी चालकाने गाडी थांबवली होती. संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे पालक सतीश शिंदे म्हणाले.

थर्मल गनऐवजी मेटल डिटेक्टरने तपासणी
कोरोनामुळे सर्वत्र थर्मल गनने तपासणी केली जात आहे. परंतु अनेक परीक्षा केंद्रांवर चक्क मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली. मोबाईल आहे की नाही, हे पाहण्यासाठी अशी तपासणी केली गेली.

दोन मिनिटांसाठी परीक्षेची संधी हुकली
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्रांवर सकाळच्या सत्रात पवन गीते, पंकज राजपूत, संजय गायकवाड या परीक्षार्थींना उशिरा आल्याचे म्हणत प्रवेश नाकारण्यात आला. पवन गीते म्हणाला, बुलढाणा येथून आलाे. सकाळी ९.३५ वाजेपर्यंत येणाऱ्यांना प्रवेश दिला. मी ९.३७ वाजता आलो. परिसरात दोन ते तीन गेट आहे. त्यामुळे केंद्र शोधण्यात वेळ गेला. सदर विद्यार्थी ९.५० वाजता आल्याचे केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग म्हणाले...
सदर परीक्षा ही आऊटसोर्सिंगद्वारे घेण्यात आली आहे. पेपर उशिरा आले. त्यामुळे परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली हाेती, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. तर आऊटसोर्सिंगच्या अधिकाऱ्यांनी केंद्रावर पेपर पोहोचल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

Web Title: Admission denied if student arrives late In exam; What about the late arrival of the exam paper?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.