औरंगाबादच्या कामगारांच्या खिशात  ७५ कोटींचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 06:06 PM2020-11-07T18:06:01+5:302020-11-07T18:07:27+5:30

औरंगाबादच्या ७५ टक्के उद्योगांनी जवळपास ७५ ते ८० कोटी रुपयांचा बोनस वाटप करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

75 crore bonus in the pockets of Aurangabad workers | औरंगाबादच्या कामगारांच्या खिशात  ७५ कोटींचा बोनस

औरंगाबादच्या कामगारांच्या खिशात  ७५ कोटींचा बोनस

googlenewsNext
ठळक मुद्देउर्वरित २५ टक्के उद्योगांचे बोनस वाटप १० तारखेपर्यंतमागील वर्षी येथील उद्योगांनी शंभर कोटींच्या जवळपास कामगारांना बोनस वाटप केला होता.

- विजय सरवदे 
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विसकटलेल्या उद्योगांकडून यंदा बोनस मिळेल की नाही, अशी संभ्रमावस्था कामगारांची होती. मात्र, कालपर्यंत औरंगाबादच्या ७५ टक्के उद्योगांनी जवळपास ७५ ते ८० कोटी रुपयांचा बोनस वाटप करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उर्वरित २५ टक्के उद्योग मात्र १० नोव्हेंबरपर्यंत बोनसचे वाटप करतील, अशी अपेक्षा आहे. 

लॉकडाऊनमुळे यंदा उद्योगांचे अर्थचक्र कोलमडले होते. साधारणपणे एप्रिलपासून तब्बल साडेतीन महिने औरंगाबादसह देशभरातील उद्योग ठप्प होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल केले. त्यानंतर उद्योग पूर्वपदावर आले. देशभरातील बाजारपेठाही उघडल्या. दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडे ऑर्डरचे प्रमाणही वाढले. तेव्हा कुठे उद्योजक व कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. 

मागील वर्षी येथील उद्योगांनी शंभर कोटींच्या जवळपास कामगारांना बोनस वाटप केला होता. यावर्षीही तेवढाच किंवा थोड्याफार फरकाने बोनस वाटप होईल, असा अंदाज कामगार संघटना व उद्योजकांनी व्यक्त केला आहे. या महिन्याच्या ३ तारखेपासून उद्योगांनी बोनस वाटप सुरू केले. काही उद्योगांनी ५५ हजार रुपयांपासून ते १६ हजार रुपयांपर्यंत बोनसची रक्कम वाटप केल्याचे ‘सिटू’ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर व दामोदर मानकापे यांनी सांगितले. 

दोन-तीन दिवसांत खरेदीसाठी उसळेल गर्दी
बोनसची रक्कम कामगारांच्या हातात पडली. मात्र, त्या तुलनेत बाजारात सध्यातरी खरेदीसाठी  गर्दी होताना दिसत नाही. शनिवारी आणि रविवारी बाजारपेठेत काही प्रमाणात गर्दी दिसेल. यासंदर्भात काही जाणकारांचे मत असे आहे की, १० तारखेच्या आत सर्वच कामगारांच्या हातात बोनस व वेतन पडेल. प्राप्त पैशाचे नियोजन करून कामगारांची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडेल. दिवाळीच्या सणावर कोरोनाचे सावट दिसणार नाही. 

व्यापारी देणार कर्मचाऱ्यांना ५० कोटींचा बोनस
शहरात १० हजार व्यापारी त्यांच्याकडील सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहेत. या बोनसरूपातील ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम पुन्हा बाजरात येणार आहे. दरवर्षी केंद्र सरकार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, औद्योगिक वसाहतीत कामगारांना वाटप होणारा बोनस, याचीच चर्चा होत असते. त्यावरून बाजारपेठ किती कोटींची उलाढाल होणार, याचा अंदाज बांधला जात असतो. मात्र, बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करीत असतात. या बोनसची मोठी रक्कम खरेदीच्या निमित्ताने पुन्हा बाजारपेठत येत असते. मात्र, याची चर्चा होत नाही. बाजारपेठ मोठ्या प्रमाणात रोजगार देत असते. शहरात सुमारे १० हजार व्यापारी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ८ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत बोनस देत असतात. या व्यापाऱ्यांकडे प्रत्येकी ५ कर्मचारी, असे ५० हजार कर्मचारी आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना, नोकरांना पगार देणे सुरू केले आहे. सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम बोनसपोटी बाजारात येणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल मालानी यांनी दिली. 

आहे त्या कर्मचाऱ्यांवरच व्यापाऱ्यांची मदार
दरवर्षी दसऱ्याच्या आधी काही कर्मचारी नोकरी सोडून जात असतात, तर कापड बाजारात हंगामी कर्मचाऱ्यांची गरज पडत असते. मात्र, यावेळी कर्मचारी नोकरी सोडून गेले नाहीत. यामुळे दसरा- दिवाळीदरम्यान नवीन नोकर भरतीची गरज पडली नाही.
 -जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: 75 crore bonus in the pockets of Aurangabad workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.