30-30 scam: कोट्यवधी रुपयांच्या ३०-३० योजना घोटाळ्यातील मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 12:55 PM2022-01-22T12:55:59+5:302022-01-22T12:59:05+5:30

30-30 scam: बिडकीन पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल : अटक करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची तगडी फिल्डिंग

30-30 scam: Mastermind of crores of rupees scam in 30-30 schemes have been handcuffed | 30-30 scam: कोट्यवधी रुपयांच्या ३०-३० योजना घोटाळ्यातील मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या

30-30 scam: कोट्यवधी रुपयांच्या ३०-३० योजना घोटाळ्यातील मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या फटे योजना घोटाळ्यासारखाच पैठण तालुक्यात ३०-३० योजना राबवून कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (रा. मुंडवाडी, ता. कन्नड) यास ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेची अधिकृत माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिली.

शेअर बाजारातील नफ्याच्या आमिषाला भुलून सोलापूर जिल्ह्यात कोट्यवधींचा फटे गुंतवणूक घोटाळा राज्यात गाजत आहे. हा घोटाळा उघड होण्यापूर्वी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्यात जांभळी गावातील एका महिलेने तक्रार दिली होती. त्यावरुन संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेने पैसे मिळाले असून, तक्रार मागे घेत असल्याचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे राठोडची अटक टळली होती. यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल, अतिरिक्त अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी विविध पोलीस ठाण्यात शिबिर घेत या प्रकरणातील फसवणूक झालेल्यांनी पुढे येत तक्रार देण्याचे आवाहन केले होते; मात्र अनेकजण पुढे येण्यास धजावले नव्हते. शुक्रवारी बिडकीन ठाण्यात दौलत जगन्नाथ राठोड (४६, रा. निजलगाव फाटा, बिडकीन) यांनी कृष्णा एकनाथ राठोड (रा. बंगलातांडा, ता. पैठण), पंकज शेषराव चव्हाण (रा. बोकुड जळगाव तांडा, ता. पैठण) आणि मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड यांच्या विरोधात तक्रार दिली. या तिघांनी मिळून ३३ लाख ५० हजार रुपये ३०-३० योजनेत गुंतवणूक करण्यासाठी घेतले. त्याबदल्यात ६५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा मिळणार होता, असे आमिष दाखविले असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती बिडकीनचे ठाणेदार संतोष माने यांनी दिली. तसेच या घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोड यास कन्नड येथून ताब्यात घेत अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

जि.प. सदस्यांचे तीन कोटी
जिल्हा परिषदेच्या एका सदस्यानेही अनेकांकडून गोळा करून या योजनेत ३ कोटी रुपये गुंतवले होते. ते पैसेही आता बुडीत खात्यात निघाल्याची माहिती समोर आली आहे.हा सदस्यही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, सर्व बँक डिटेल्स घेऊन येण्यास सांगण्यात आल्यामुळे तो शनिवारी तक्रार दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन लाख मागितले अन् दिले नाहीत
३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार देणाऱ्या दौलत राठोड यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवला आहे. मात्र, त्यांना आरोपींकडून सतत पैसे परत करण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. त्यामुळे तक्रारदार परत जात होता. तक्रारदारला दोन लाख रुपयांची अतिशय गरज असल्यामुळे त्यांनी मागितले. मात्र, आरोपींनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे अखेर तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कन्नड येथून घेतले ताब्यात
तक्रार प्राप्त होताच ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड यास चौकशीसाठी कन्नड पोलीस ठाण्यात बोलावले. नेहमीप्रमाणे तो ठाण्यात हजर झाला. त्याचवेळी पोलिसांनी त्यास अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी अतिशय गोपनीयता पाळली असल्याचेही समोर आले आहे.

ठाण्यासमोर नागरिकांची गर्दी
मध्यरात्रीपर्यंत बिडकीन पोलीस ठाण्यासमोर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत संतोष राठोड याच्याविरोधात कोणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. मात्र, त्यास अटक केल्याचे समजताच अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्याचे चित्र बिडकीन ठाण्यासमोर पाहायला मिळाले.

Web Title: 30-30 scam: Mastermind of crores of rupees scam in 30-30 schemes have been handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.