दाम दुपटीचे आमिष दाखवून ३ कोटी २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 05:30 PM2019-08-23T17:30:18+5:302019-08-23T17:33:08+5:30

दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

3 crore 29 lakh fraud by showing a double price bait | दाम दुपटीचे आमिष दाखवून ३ कोटी २९ लाखांची फसवणूक

दाम दुपटीचे आमिष दाखवून ३ कोटी २९ लाखांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारींची संख्या वाढणारकुणकुण लागताच दोघेही फरार 

औरंगाबाद : व्यवसायात पैसे गुंतविल्यास दाम दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून दोघांनी काही व्यापाऱ्यांकडून तब्बल ३ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीनकुमार रामकृष्ण शेळके आणि सत्यकुमार रामकृष्ण शेळके अशी आरोपींची नावे आहेत. 

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, हर्षल कैलासराव झरेकर (३२, रा. न्यू विशालनगर, गारखेडा) हे व्यावसायिक असून, त्यांचे बीड बायपास रोडवर एक हॉटेलही आहे. झरेकर यांचा मित्र अभिजित हिवाळे याने २०१८ मध्ये जालना रोडवरील कुबेर अ‍ॅव्हेन्यू कॉम्प्लेक्समधे नित्यसेवा सर्व्हिसेसचे मालक नितीन रामकृष्ण शेळके आणि त्यांचा भाऊ सत्यकुमार रामकृष्ण शेळके यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी शेळके समूह, नित्यसेवा सर्व्हिसेस, गोविंदम हॉटेल, एस. आर. कन्स्ट्रक्शन असे अनेक व्यवसाय आहेत, असे या आरोपींनी त्यांना सांगितले.

या व्यवसायात गुंतवणूक केल्यास ९ महिन्यांत दाम दुप्पट मिळतील, असे आमिष नितीन शेळके यांनी दाखविले. परंतु झरेकर यांनी गुंतवणुकीबाबत नंतर बघू असे म्हणून विषय टाळला. आठवड्यानंतर नितीन शेळके, सत्यकुमार शेळके हे दोघेजण झरेकर यांच्या हॉटेलवरच दाखल झाले. त्यांनी झरेकर यांच्या व्यवसायाबद्दल माहिती घेतली. आपला व्यवसाय चांगला आहे. आमच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास नऊ महिन्यांत रक्कम दुप्पट देऊ, असे आश्वासन दिले. झरेकर यांनी शेळके यांच्या व्यवसायात पैसे गुंतविण्याचा विचार केला. २८ सप्टेंबर २०१८ मध्ये सुरुवातीला २ लाख रुपयांची रक्कम नितीन शेळके यांच्याकडे दिली. त्यावेळी भाऊ सत्यकुमार शेळके आणि सासरे कचरू डिके दोघेही उपस्थित होते. त्यानंतर शेळके यांच्या मागणीनुसार झरेकर यांनी १८ वेळा एनएफटीद्वारे पैसे पाठविले तर रोखीने ६७ लाख १३ हजार ९९ अशी एकूण १ कोटी २ लाख १५ हजार ९९९ रक्कम गुंतविली. काही रक्कम मित्रांच्या खात्यावरून शेळके यांना पाठविली. काही वेळेस नितीन शेळके बाहेरगावी असल्याने सत्यकुमार शेळके आणि सासरे कचरू मोहन डिके यांच्याकडे रक्कम सुपूर्द करण्यात आली. अशाप्रकारे हर्षल झरेकर यांनी रोख आणि एनएफटीद्वारे तब्बल १ कोटी ४३ लाखांची रक्कम गुंतविली. 

काही काळानंतर मुद्दल आणि नफ्याबाबत झरेकर यांनी नितीन आणि सत्यकुमारकडे विचारणा केली. त्यावेळी थोडे दिवस थांबा, गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावरील नफा, असे सर्व मिळून दिले जाईल, असे उत्तर शेळके यांनी दिले. पाठपुरावा सुरूच ठेवल्याने २७ फेब्रुवारी आणि ९ मार्च अशा दोन वेळा ४० हजार आणि २४ हजार ९९९ रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली. काही महिन्यांनंतर पुन्हा दोन्ही भावांकडे पैशांबाबत विचारणा केली. प्रत्येक वेळी विविध कारणे सांगून वेळ निभावण्यात आली. त्यातच जुलै २०१९ मध्ये सत्यकुमार शेळके याने त्याचा भाऊ नितीन शेळके हा घरातून निघून गेला असल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती झरेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही भाऊ आणि सासरे कचरू डिके यांचा कार्यालयात, हॉटेलवर शोध घेतला. परंतु तिघांची कोठेही भेट झाली नाही. 

हर्षल यांचे वडील कैलासराव झरेकर यांनीही १४ लाख रुपये शेळके यांच्या व्यवसायात गुंतविले. त्याचप्रमाणे रवींद्र साळुंके, राजेश हिवाळे, विक्रांत बिजमवार, जयवंत नजन, विद्यासागर बैनाडे, जीवन जाधव, समीर भडके, किरण राऊत, अभिजित हिवाळे या लोकांकडूनही याच पद्धतीने तब्बल १ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम उकळली. अशा प्रकारे नितीन शेळके आणि सत्यकुमार शेळके यांनी गुंतवणूकदारांची ३ कोटी २९ लाख ६५ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

कुणकुण लागताच दोघेही फरार 
आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी मध्यरात्री या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळीच या दोघांच्या घरी जाऊन पाहणी केली असता दोघेही फरार झाले होते. गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण या दोघांना लागल्याने ते फरार झाले आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल.

तक्रारींची संख्या वाढणार
नितीन आणि सत्यकुमार या दोघांनी आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या रकमा उकळल्या आहेत. परंतु त्यातील काही जणच तक्रार देण्यासाठी समोर आलेले आहेत.  

Web Title: 3 crore 29 lakh fraud by showing a double price bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.