औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर; महापालिका निवडणुक जिंकण्याच्या दिशेने महाआघाडीचे पाऊल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:59 PM2020-02-20T19:59:20+5:302020-02-20T20:01:27+5:30

महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे.

152 crore sanctioned for roads in Aurangabad; Mahaaghadi's the next step towards winning the municipal elections | औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर; महापालिका निवडणुक जिंकण्याच्या दिशेने महाआघाडीचे पाऊल  

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर; महापालिका निवडणुक जिंकण्याच्या दिशेने महाआघाडीचे पाऊल  

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व कामे एकाच वेळी सुरू होणारतीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली कामे

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्याच्या दिशेने पाऊल म्हणून महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी २४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून २० रस्त्यांची कामे केली जाणार असून, विशेष म्हणजे केवळ तीन दिवसांमध्ये कामाच्या  निविदाही काढण्यात येणार आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी एकाच टप्प्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या रस्त्यांची स्थिती आणखी उत्तम होणार आहे. शहरातील रस्त्यांसाठी निधी जाहीर केल्याचे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत जाहीर केले. नव्याने मिळणाऱ्या १५२ कोटी रुपयांच्या निधीमधून महापालिका आठ रस्ते तयार करणार आहे. सहा रस्त्यांची कामे रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सहा कामे सोपविण्यात आली. कमी वेळेत आणि कामांची गुणवत्ता चांगली असावी यादृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला. 

शहरातील रस्त्यांसाठी याआधी राज्य शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींतून सध्या ३० रस्त्यांची कामे सुरू आहेत. आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच करण्यात आली  होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेला यादी अंतिम करण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निधी मिळाला नाही. दरम्यान महापालिकेतर्फे २६३ कोटी रुपयांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्याचा निधी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून १५२ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.

राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निधीतील कामे महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या तिन्ही विभागांना देण्यात आली आहेत. तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येकी सहा रस्त्यांची कामे एमआयडीसी व एमएसआरडीसीतर्फे केली जाणार आहेत. उर्वरित आठ रस्त्यांची कामे महापालिका करणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अंबलगन, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची उपस्थिती होती. 

तीन दिवसांत निविदा निघणार
शहरातील २२ रस्त्यांच्या कामांची निविदा तीन दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे. महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे. एकूण २० रस्त्यांची २२ किलोमीटरची कामे केली जाणार आहेत. नेमकी कोणत्या रस्त्यांची कामे हाती घ्यायची, याचा निर्णय औरंगाबादमध्ये आल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व सर्व कामे एकाच वेळी सुरू करून कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून तीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली आहेत.

तीन विभागांना प्रत्येकी ५० कोटींची कामे 
तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे या कामांमध्ये साईड ड्रेन, फुटपाथ, दुभाजकांसह रोड फर्निचरच्या कामांचाही समावेश आहे.

Web Title: 152 crore sanctioned for roads in Aurangabad; Mahaaghadi's the next step towards winning the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.