दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:07 PM2020-10-11T12:07:17+5:302020-10-11T12:09:46+5:30

दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या  तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

119 electricity poles of Dalit Vasti Sudhar Yojana go missing | दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

googlenewsNext

औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

भीमनगर, वॉर्ड क्रमांक-१३ या परिसरात निसर्ग कॉलनी, राजनगर, ग्रीनसिटी, लालमाती, सम्राट अशोक सोसायटी, जेतवन हाऊसिंग सोसायटी  आदी भागांत १५ हजारांवर नागरिक राहतात. येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून २१९ खांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले  होते. परंतु त्यानंतरही परिसरात खांबांसाठी अर्ज आले. यावरून सतीश शेगावकर यांनी यासंदर्भात महावितरणकडे तक्रार केली. काम पूर्ण न करताच बिल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांच्यासह  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.

वीज खांबांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेला पैसा कामे न करताच हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत २१९ पैकी ११९ खांब गायब आहे. याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केल्याचे सतीश शेगावकर म्हणाले.  याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार परिसरात पाहणी केली असून खांब टाकल्याचे कंत्राटदाराचे  म्हणणे आहे. त्यामुळे समिती स्थापन करून परिसरात पाहणी करून प्रत्येक खांबाची मोजणी केली जाणार आहे. कुठे खांब टाकले, हे समितीला  कंत्राटदाराला दाखवावे लागणार आहे, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ म्हणाले.

 

Web Title: 119 electricity poles of Dalit Vasti Sudhar Yojana go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.