Youth Congress hits, FDA rally | युवक काँग्रेसची धडक, एफडीएच्या धाडी

युवक काँग्रेसची धडक, एफडीएच्या धाडी

ठळक मुद्देविभागातून १२ निरीक्षक दाखल : ‘लोकमत’ वृत्ताचा हवाला देऊन विचारला अधिकाऱ्यांना जाब

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाभरात सुरू असलेल्या गुटखा विक्री आणि तस्करीबाबत ठोस कारवाई होणार केव्हा, हा जाब विचारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी धडक दिली. एफडीए अधिकाऱ्यांसमोर परिसरातूनच घेतलेल्या गुटखा पुड्या त्यांनी ठेवल्या. यादरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भ्रमणध्वनीवर एफडीए अधिकाऱ्यांना गुटखाबंदीच्या आदेशाची आठवण केली.
‘लोकमत’मध्ये शुक्रवारी ‘पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीए कार्यालयावर धडक देत गुटखाबंदीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी आदेश दिले असताना कारवाई का नाही, तुम्ही पैसे खाता असे म्हणायचे का, असा आरोप युवक काँग्रेसने केला. गुटखा निर्मिती कारखान्यांची ठिकाणे, विक्री आणि गोदामांची माहिती प्रसिद्ध झालेला ‘लोकमत’ एफडीए अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा एफडीए अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून दिला. यावेळी ना. ठाकूर यांनी गुटखाविक्रीची स्थळे, तस्करीचे मार्ग ‘लोकमत’ला दिसतात; एफडीए अधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात गुटखाबंदी झालीच पाहिजे. जे काही करायचे असेल ते करा, मला कारणे सांगू नका. गाठ माझ्याशी आहे हे लक्षात घ्या, अशी तंबी ना. यशोमती ठाकूर यांनी एफडीए अधिकाऱ्यांना दिली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश महासचिव समीर जवंजाळ, प्रदेश सचिव राहुल येवले, प्रद्युम्न पाटील, सागर कलाने, तिवसा विधानसभा अध्यक्ष रीतेश पांडव, रोहित देशमुख, अंकुश जुनधरे, सागर जुनघरे आदींनी गुटखाबंदीची मागणी आक्रमकपणे मांडली.

गुटखा विक्रेते, तस्करांवर ‘मोका’ लावू - पालकमंत्री
राज्यात गुटखाबंदी अगोदरच लागू आहे. मात्र, गुटखा बंद होण्याऐवजी यात वाढ झालेली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, आता गुटखा विक्रेते आणि तस्करांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) लावण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून भविष्यात गुटखा विक्रेते आणि तस्करांवर ‘मोका’ लागू करण्याच्या दिशेने वाटचाल राहील, असे राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

एफडीएचे गुटखा केंद्रांवर धाडसत्र; कारवाईची गुप्तता
पालकमंत्री यशोमती ठाकृूर गुटखाबंदीबाबत आक्रमक झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागला आहे. शुक्रवारी बडनेरा, अमरावती शहरात काही ठिकाणी धाडसत्र राबविले. मात्र, गुटखा किती जप्त केला, याविषयी एफडीएने कमालीची गुप्तता बाळगली आहे. गुटखा विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी विभागातून १२ अन्न व औषध निरीक्षकांना पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.

‘एफडीए’कार्यालयानजीक गुटखाविक्री?
येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर गुटखा विक्री होत असल्याची बाब युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. ‘तुम्ही कार्यालयानजीक गुटखाविक्री बंद करू शकत नाही, तर जिल्ह्यात काय बंदी करणार?’ असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. मात्र, एफडीए गुटखाबंदीसाठी तत्पर असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांनी दिले. येत्या काही दिवसांत ‘रिझल्ट’ दिसेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Youth Congress hits, FDA rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.