Vidhan Sabha 2019: जो तो म्हणतोय भावी आमदार, बच्चू कडूंवर विरोधक कसा करणार 'प्रहार'?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 08:13 PM2019-09-18T20:13:14+5:302019-09-19T10:12:53+5:30

बच्चू कडूंची आंदोलने राज्यभरात पोहोचली आहेत.

Will the opposition succeed in 'PRAHAR' of Bacchu Kadu? | Vidhan Sabha 2019: जो तो म्हणतोय भावी आमदार, बच्चू कडूंवर विरोधक कसा करणार 'प्रहार'?

Vidhan Sabha 2019: जो तो म्हणतोय भावी आमदार, बच्चू कडूंवर विरोधक कसा करणार 'प्रहार'?

googlenewsNext

अमरावती : सलग तीनदा आमदार राहिल्यानंतर चौथ्यांदा निवडणुकीसाठी बच्चू कडू सज्ज झाले आहेत. मतदारसंघाची त्यांची बांधणी पक्की आहे. त्यांच्यापुढे तगडे आव्हान नसले तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हेदेखील कामी लागले आहेत. त्यामुळे या दोघांशिवाय आणखी कोण भाजपा, सेना वा युतीकडून उभा ठाकतो, यावर अचलपूर मतदारसंघाच्या निवडणुकीचा रंगतदारपणा निश्चित होणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनांसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी सध्याच्या घडीला प्रचारात आघाडी मिळविली आहे. त्यांना कोंडीत पकडण्यात विरोधक प्रत्येक निवडणुकीत अपयशी ठरले आहेत, हे नक्की.

२ लाख ७६ हजार मतदारसंख्या असलेल्या अचलपूर मतदारसंघात अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांसह अचलपूर तालुक्यातील १२ गावांसह संपूर्ण चांदूर बाजार तालुका समाविष्ट आहे. या मतदारसंघात बच्चू कडू चौथ्यांदा निवडणूक लढणार आहेत. देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात प्रतिकात्मक आंदोलनाने आव्हान देणारे बच्चू कडू रुग्णसेवेसाठी प्रसिद्धीच्या वलयात आले आणि २००४ पासून या मतदारसंघातून प्रहारचा झेंडा घेऊन अपक्ष म्हणून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्या विरोधात सध्याच्या घडीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख मैदानात आहेत. यापूर्वीच्या २०१४ च्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावले होते.

भाजपाने जिल्ह्यात सुरू केलेल्या विजय मोहिमेत अचलपूर मतदारसंघ हा तिवस्यापाठोपाठ प्रमुख अडसर आहे. गतवेळी भाजपचे अशोक बनसोड यांनी चिकाटी दाखवत बच्चू कडूंपाठोपाठ दुस-या क्रमांकाची मते घेतली होती. या पक्षाकडून यंदा गजानन कोल्हे इच्छुक आहेत. या मतदारसंघात माळी समाज विरुद्ध इतर असे समीकरण निवडणुकीच्या निमित्ताने उभे ठाकते. दिवंगत राज्यमंत्री विनायकराव कोरडे यांच्या विजयानंतर माळी समाजाची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपा या समीकरणानुसार तिकीट वाटप करते किंवा कसे, हे पाहावे लागेल. त्याशिवाय ऐनवेळी युती न झाल्यास शिवसेनेकडूनही उमेदवार उभा केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय पाटील टवलारकर यांच्यासह काहींनी ‘मातोश्री’वर पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. गतवेळी मैदानात असलेले हाजी मोहम्मद रफीक शेठ बच्चू कडू यांच्या गोटात आहेत. राष्ट्रवादीच्या संगीता ठाकरे यांच्याकडून तूर्तास कुठल्याही हालचाली नाहीत. 

आ. बच्चू कडूंची आंदोलने राज्यभरात पोहोचली आहेत. त्यांच्या रुग्णसेवा व अपंगसेवेचा गवगवा आधीपासून आहेच. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप वेळोवेळी त्यांच्याविरोधात केला जातो. त्यावर उत्तर म्हणून आपण केलेल्या विकासकामांचा पाढाच त्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रपरिषदेत वाचला. एकंदर रणांगणावर बिगूल केव्हाही वाजू शकतो; अशावेळी चाचपडत असल्याचे चित्र विरोधकांसाठी आशादायी नाही.

जो-तो आमदार
विधानसभा निवडणुकीची अद्याप अधिसूचना नाही. त्यापूर्वीही पाचशे ते हजार मतांची क्षमता राखणारे अनेक जण भावी आमदार म्हणून फेसबूकवर मिरवत आहेत. त्यांना पुढे करून विरोधी गोटातील मतदान कमी करता येईल का, अशी व्यूहरचना या निवडणुकीत दृष्टीस पडू शकते.

 

 

Web Title: Will the opposition succeed in 'PRAHAR' of Bacchu Kadu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.