अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:02+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

When will the corona test of officers and employees? | अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केव्हा?

अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केव्हा?

Next
ठळक मुद्देअप-डाऊनमध्ये दोन्हीकडे वाढतोय धोका : ग्रामीण भागात झपाट्याने संसर्ग

मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तालुकास्तरावरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्याची कोरोनासंबंधी चाचणी होणे महत्त्वाचे आहे. अपडाऊन करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्यासह दिवसभर संपर्कात येणारे सहकर्मी व कुटुंबीयांना कोरोनाचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात चाचणीचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही मोठी झाली आहे. कोरोना संक्रमितांचा आकडा ११ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात २२८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड चाचणी लवकर झाली, तर उपचाराचे प्रमाण वाढत जाणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुळात इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश वरिष्ठाकडून दिले जावेत, ही मागणी वारंवार केली जात असते. मात्र, कोरोनाच्या शिरकावाला अर्धे वर्ष होत आले तरी मागणीबाबत वरिष्ठांकडून कार्यवाही झाली नाही.

तालुकास्तरावर हवीत शिबिरे
तालुक्यात तहसील, पंचायत समिती, भूमिअभिलेख, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अप्पर वर्धा प्रकल्प, दुय्यम निबंधक, तलाठी , नगर परिषद, पोलीस ठाणे, बाजार समिती, जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षक आणि अनेक कार्यालयीन कर्मचारी येतात. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तालुकास्तरावर आरटी-पीसीआर चाचणी तपासण्याची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाने आदेश काढून आपल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेतली तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या जिवाला धोका राहणार नाही व कुटुंबीयही सुरक्षित राहतील याशिवाय कार्यालयीन कामकाजादरम्यान संपर्कात येणाऱ्या इतरांनाही कोणता धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ही शिबिरे होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तुटण्यातही मोठी मदत होणार असल्याचे मत आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले आहे.

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेण्यासाठी कार्यालयप्रमुख व आरोग्य यंत्रणेला पत्र देऊन पुढील आठवड्यात त्यांची चाचणी करून घेण्यात येणार आहे. धामणगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच व्यापारी, दुकानदार यांनी कोरोनासंबंधी चाचण्या करून घ्याव्यात.
-भगवान कांबळे
तहसीलदार धामणगाव रेल्वे

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात अँटिजन तपासणी सुरू आहे. जिल्ह्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक ९६० जणांची तपासणी झाली. दररोज साडेबारा वाजता ही तपासणी केवळ अर्ध्या तासात करता येते. कोरोनाची लागण झाले की नाही, हे लगेच कळते. सर्वांनी तपासणी करून घ्यावी.
-डॉ. महेश साबळे, अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे

दोन्ही संपर्कातील व्यक्ती होतात बाधित
आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये व शासकीय कामकाज नेटाने पार पाडता यावे, यासाठी दररोज जिल्हास्तरावरून अनेक अधिकारी-कर्मचारी ज्या ठिकाणी सेवा बजावायची आहे, त्या ठिकाणी अप-डाऊन करतात. हे कर्मचारी आपल्या कुटुंबानंतर दररोज कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर सदर कर्मचारी हा कोरोना संक्रमित होतो व त्याचा प्रसार हा कुटुंबातील व्यक्तींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे असे अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही ठिकाणी कोरोनाचे माध्यम ठरू शकतात. आपल्या कुटुंबाला धोका होऊ नये व स्वत: सुरक्षित असल्याची खात्री असावी, याकरिता त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.

Web Title: When will the corona test of officers and employees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.