लग्नसमारंभांना ३-१ मार्चपर्यंत मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:45+5:30

सायन्स कोर मैदानावरील हस्तकला विक्री व प्रदर्शन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची परवानगी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रदर्शन आयोजकांना दिले आहे.

Wedding ceremonies are forbidden from March 1-7 | लग्नसमारंभांना ३-१ मार्चपर्यंत मनाई

लग्नसमारंभांना ३-१ मार्चपर्यंत मनाई

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, स्विमिंग टँक, व्यायामशाळा, खासगी कोचिंग क्लासेसला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिनेमागृह, स्विमिंग टँक, नाट्यगृहे व खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी दिले. गर्दी होऊ नये, यासाठी सभागृह, मंगल कार्यालये व मंडपातील सर्व कार्यक्रमदेखील ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणाला दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक आदेश १३ मार्चपासून लागू करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू करण्यात आला आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग व कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये, दिली असल्यास रद्द करावी. सभागृह, मंगल कार्यालये व मंडपातील सर्व समारंभ ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिकेचे आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व मुख्याधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
सायन्स कोर मैदानावरील हस्तकला विक्री व प्रदर्शन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची परवानगी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रदर्शन आयोजकांना दिले आहे.

आयसोलेशन वार्डातील व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. क्वारंटाइन कक्षात सध्या एकही रुग्ण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. मंडप व मंगलकार्यालयातील कार्यक्रम स्थगितीच्या सूचना दिल्यात.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

पालकमंत्र्यांद्वारा आज यंत्रणेचा आढावा
कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंध घालण्याकरिता शासनाने अत्यावश्यक पावले उचलली आहे. यंत्रणाही सुसज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले. यासंदर्भात सोमवारी सर्व यंत्रणेचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी व ग्रामीण यंत्रणा अशा दोन टप्प्यात ही बैठक होणार आहे.

जागृतीसाठी तालुक्यांना १० हजार
मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये बुधवारी दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाविषयक जागृतीसाठी प्रत्येक तालुक्याला १० हजारांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यानुसार आता फलक, पोस्टर व अन्य माध्यमातून गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काय करावे व काय करु नये आदीद्वारे प्रत्येक गावात जागर केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

महापालिका क्षेत्रात शाळा बंदचे आदेश
अमरावती महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी अब्दूल राजीक यांनी रविवारी दिले. १० व १२ वीच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घ्याव्यात. आजारी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित संस्थाप्रमुखांना देण्यात आलेले आहे.

सह्याद्री महानाट्य रद्दचे निर्देश
येथील शिवाजी बीपीएड कॉलेजच्या पटांगणात ९ ते ११ एप्रिल दरम्यान सह्याद्री महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांद्वारा जिल्हा प्रशासनाला १२ मार्चला पत्र देण्यात आले. यामध्ये ५०० कलावंत यासह हत्ती, घोडे, उंट व कार्यक्रमाला किमान ५ ते ६ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचे नमूद आहे. मात्र, गर्दीचे कार्यक्रम रद्दचे शासनादेश असल्याने हा कार्यक्रम रद्दचे आदेश आरडीसी नितीन व्यवहारे यांनी १३ मार्चला दिले.

‘त्या’ नागरिकांच्या तपासणीसाठी दोन पथके
परदेशतून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आलेली आहेत. रविवारी सीएस कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा पुनसे व डॉ राहुल परसावणे व सिस्टर स्मिता रंगारी यांचा पथकात समावेश आहे. नागरिकांशी सौदार्हपूर्ण शब्दांत विचारणा करा व विहित कालावधीत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा बंदचे आदेश
शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये व आयटीआयदेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय जिल्हाभरातील सर्व अंगणवाड्यादेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी पत्र जारी केले आहे.

सांस्कृतिक भवनात निवडणूक प्रशिक्षण कसे?
ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात रविवारी येथील सांस्कृतिक भवनात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षणोत्सवासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. प्रशिक्षणालादेखील कर्मचाऱ्यांची गर्दी होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा हा दुजाभाव का, अशी विचारणा होत आहे. यानंतर २५ ते ३० कर्मचाऱ्यांना ग्रुपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Wedding ceremonies are forbidden from March 1-7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.