कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात आघाडीतील गुंता कायम !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 09:43 PM2019-09-20T21:43:09+5:302019-09-20T21:43:37+5:30

अनिल बोंडे हे सन २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत.

Vidhan Sabha 2019 : morshi constituency of agriculture minister anil bonde | कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात आघाडीतील गुंता कायम !

कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात आघाडीतील गुंता कायम !

Next

अमरावती : कृषिमंत्री असलेल्या अनिल बोंडे यांचा मोर्शी मतदारसंघ आघाडीत कुणाला सुटणार याबाबतची निश्चिती नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या मित्रपक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

अनिल बोंडे हे सन २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आल्याने मतदारसंघाला अधिक महत्त्व आले आहे. भाजपक्षातून इतर कुणी प्रभावी व्यक्ती उमेदवारीसाठी इच्छुक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघांप्रमाणे अंतर्गत कलह येथे नाही. १९९९, २००४, २००९ व २०१४ या तिन्ही निवडणुकीतील पहिल्या तीन क्रमांकावर राहिलेले उमेदवार २०१९ च्या निवडणुकीत आमने-सामने असतील, असे सध्याचे चित्र आहे.

चार निवडणुकीत अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख यांच्यात लढती झाल्यात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी १२५ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची घोषणा झाली असली तरी मतदारसंघनिहाय जागावाटप जाहिर झालेले नाही. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख दुसऱ्या क्रमांकावर होते. विदर्भातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद त्यांचेकडे असल्याने ते यंदा निवडणुकीपासून दूर राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रेसकडून कुणीही उमेदवारी मागितलेली नाही.

मागील निवडणुकीत तिस-या क्रमांकाची मते घेणारे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे त्यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांच्या कांंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. नरेशचंद्र ठाकरे हे १९९९ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार होते. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी लढण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आल्यास ही जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आघाडीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच आघाडीच्या उमेदवारीचा पेच सुटण्याचे संकेत आहेत.

सेनेचा दावा
१९९९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय यावलकर तर २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले विद्यमान कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रभाकर काळे, राजेंद्र आंडे, नारायण शेटे, शरद गुडधे, बंडू साऊत व धीरज खोडसकर यांनी मोर्शी मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर मुलाखती दिल्या आहेत. मात्र भाजपक्षाच्या तुलनेत त्यांचा दावा फारसा सशक्त नाही.

 

Web Title: Vidhan Sabha 2019 : morshi constituency of agriculture minister anil bonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.