अडीच महिन्यांची गर्भवती म्हणाली, ते बाळ माझेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:14+5:302021-09-25T04:13:14+5:30

अमरावती : महिलेपाठोपाठ तिच्या पतीला झेरॉक्ससाठी पाठवून त्या दाम्पत्याच्या दीड महिन्याच्या बाळाला पळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन अपहरणकर्तीला ...

The two and a half month pregnant woman said, that baby is mine! | अडीच महिन्यांची गर्भवती म्हणाली, ते बाळ माझेच!

अडीच महिन्यांची गर्भवती म्हणाली, ते बाळ माझेच!

Next

अमरावती : महिलेपाठोपाठ तिच्या पतीला झेरॉक्ससाठी पाठवून त्या दाम्पत्याच्या दीड महिन्याच्या बाळाला पळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन अपहरणकर्तीला ताब्यात घेतले. बाळाला सुखरूप तिच्या आईकडे सोपविण्यात आले. मात्र, अपहरणकर्त्या महिलेने ते बाळ आपलेच असल्याचा दावा केला. डॉक्टरांच्या तपासणीअंती तोे दावा खोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपहरणकर्ती महिला केवळ अडीच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान हा थरार घडला.

नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक दाम्पत्य शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास नांदगाव पेठ येथील बसस्टॅन्डवर आले होते. ते बँकेच्या कामाबाबत बोलत असताना एक अज्ञात स्त्री तेथे आली. तुम्ही ज्या कामाबाबत बोलताय, त्यासाठी आधार व अन्य काही कागदपत्रांच्या झेरॉक्स लागतील, अशी बतावणी केली. त्यामुळे आपल्या दीड महिन्याच्या बाळाला पतीजवळ देत ती महिला झेराॅक्स आणण्यासाठी गेली. त्या अज्ञात स्त्रीने पाठोपाठ त्या पुरुषालादेखील पलीकडे पाठवत ते बाळ घेऊन तेथून पोबारा केला. झेरॉक्स काढून परतल्यानंतर दाम्पत्याला सारा प्रकार लक्षात आला. त्यांनी रडारड करत नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रवीण काळे यांनी त्या दाम्पत्याची आपबिती ऐकून घेत तातडीने लगतच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा व नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

/////////////

अवघ्या तीन तासात छडा

गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी तातडीने सूत्रे हलविली. दीड महिन्यांचे बाळ असल्याने रुग्णालय टार्गेट करण्यात आले. एका बाळाला घेऊन एक महिला डफरीनमध्ये चांगलाच गोंधळ घालत असल्याची माहिती बीटमार्शलने ठाणेदार चोरमले यांना दिली. चोरमले तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आपण कुणाच्याही बाळाचे अपहरण केले नसून, शुक्रवारी दुपारीच आपली प्रसूती झाली. ते बाळ आपलेच असल्याचा दावा तिने केला. लागलीच नांदगावचे ठाणेदार काळे त्या महिलेसह डफरीनमध्ये पोहोचले. तेथे त्या महिलेने स्वत:चे बाळ ओळखले. मात्र, तेथे अपहरणकर्तीचा गोंधळ सुरूच होता. तिच्याजवळ ती अडीच महिन्याची गर्भवती असल्याचा रिपोर्ट आढळून आला. आताच प्रसूती झाल्याचा बनाव म्हणून तिने त्या अपहृृत बाळाला लाल रंग फासला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

//////////////

डॉक्टरांनी केली सोनोग्राफी

ते बाळ आपलेच, असा दावा करणाऱ्या त्या महिलेची डफरीनमध्ये सोनोग्राफी करण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप यायचा असला, तरी त्या महिलेची प्रसूती झालेली नाही, असे डॉक्टरांकडून आम्हाला तोंडी सांगण्यात आले, अशी माहिती नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी ‘लोकमत’ला दिली. ती अपहरणकर्ती महिला तूर्तास डफरीनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The two and a half month pregnant woman said, that baby is mine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.