धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 08:12 IST2025-12-07T08:11:26+5:302025-12-07T08:12:44+5:30
बालवयापासूनच तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन जडल्याने कर्करोगाचे प्रमाणसुद्धा येथे वाढत असल्याचे पुढे आले.

धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यांच्या कारणांची मीमांसा करण्यासाठी आलेल्या मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांपुढे युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता असल्याचा मुद्दाही समोर आला.
मेळघाटाच्या स्थितीबाबत न्यायालयात याचिका दाखल करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी हा मुद्दा या दौऱ्यात प्रामुख्याने मांडला. त्यासाठी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) ला कळविले जाणार असल्याचे आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बालवयापासूनच तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन जडल्याने कर्करोगाचे प्रमाणसुद्धा येथे वाढत असल्याचे पुढे आले.
बालमृत्यू, कुपोषण, मातामृत्यू यांसाठी विविध कारणे सांगितली जात असली, तरी रक्ताल्पतेचे प्रमाण गंभीर आहे. मूलभूत सुविधांवरसुद्धा मुद्दे मांडले. कर्करोगाच्या प्रमाणाची बाबसुद्धा पुढे आली आहे.
पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे,
याचिकाकर्ता, रा. बैरागड, ता. धारणी
मेळघाट दौऱ्यात अनेक बाबी जाणून घेतल्या. १८ डिसेंबर रोजी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. रक्ताल्पता, कर्करोगाचे प्रमाण यांसाठी संशोधन केले जाणार आहे.
डॉ. निपुण विनायक,
प्रधान सचिव (आरोग्य)
महिला-पुरुषांमध्ये रक्ताची कमतरता
बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण यांबाबत विविध कारणे पुढे आली. प्रामुख्याने युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता आढळून आली. आयसीएमआरला कळवून या मुद्द्यावर संशोधन केले जाणार आहे. मेळघाटात बालवयापासून जडणाऱ्या व्यसनांसाठी आता प्रकर्षाने जनजागृती करून आदिवासींच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे सचिव निपुण विनायक यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांशी चर्चा
धारणी व चिखलदरा तालुक्यांतील अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना भेटी दिल्या. फ्रंटलाइनवरील डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. धारणी येथे सामाजिक कार्यकर्त्यांनासुद्धा बोलण्याची संधी देत समस्या ऐकून घेतल्या.