१३ हजारावर अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:01:08+5:30

कोरोना संक्रमितांची नोंद झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करून अतिजोखमीच्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठविले जातात. जिल्ह्यात साधारणपणे मार्चअखेरपासून कोरोना संसर्गासंदर्र्भातील नमुने तपासणीला पाठविण्यास सुरुवात झाली. जिल्हा शल्य कार्यालयाद्वारे सुरुवातीला नागपूरच्या एम्स लॅब, त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात येत होते.

Report negative on 13 thousand | १३ हजारावर अहवाल निगेटिव्ह

१३ हजारावर अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देचाचण्यांचा वेग वाढला : संक्रमितांचा मृत्युदर आता ३.५० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाग्रस्तांची नोंद होण्याच्या पूर्वीपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूसंबंधी नमुने पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत २६ हजार ५०२ संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. १४ हजार ७७५ थ्रोट स्वॅब नमुने पाठविले असता, १३ हजार १११ नमुने निगेटिव्ह आले आहेत. पाठविलेल्या नमुन्यांच्या तुलनेत अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण हे ८९ टक्के आहे.
कोरोना संक्रमितांची नोंद झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करून अतिजोखमीच्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठविले जातात. जिल्ह्यात साधारणपणे मार्चअखेरपासून कोरोना संसर्गासंदर्र्भातील नमुने तपासणीला पाठविण्यास सुरुवात झाली. जिल्हा शल्य कार्यालयाद्वारे सुरुवातीला नागपूरच्या एम्स लॅब, त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात येत होते. अलीकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला परवानगी मिळाल्यापासून जिल्ह्यातील सर्व नमुन्यांची याच ठिकाणी तपासणी केली जाते. साधारणपणे २०० ते २५० नमुन्यांची तपासणी येथील केंद्रावर होत आहे. तातडीने अहवाल निष्पन्न होत असल्याने संक्रमित रुग्ण त्वरेने निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार करणे सोईचे जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैैलेश नवाल यांनी दिली.
नव्या भागात संक्रमितांची नोंद झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींचे अहवाल तातडीने मिळावे व याद्वारे त्यांच्यावर तातडीने उपचार होण्याकरिता जिल्ह्यात दोन हजार रॅपिड अ‍ॅन्टीजेन किट आरोग्य विभागाद्वारे उपलब्ध झाल्या आहेत. मोदी हॉस्पिटल व पीडीएमसी येथील केंद्रांवर अगदी २० मिनिटांत कोरोनाविषयक अहवाल मिळत आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्यांच्यावर त्वरेने उपचार केले जातात व निगेटिव्ह आल्यास मात्र आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे, याच केंद्रांवर गर्भवती महिलांचीदेखील कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली.

दोन मोबाईल व्हॅनमध्ये रॅपिड अ‍ॅॅन्टीजेन टेस्ट
महापालिका क्षेत्रात मोदी हॉस्पिटल व पीडीएमसी तसेच ग्रामीण भागात तिवसा, धारणी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी व धामणगाव रेल्वे या सात ठिकाणी रॅपिड अँटिजेन केंदे्र सुरू करण्यात आलेली आहेत. याशिवाय जिथे आवश्यकता असेल, त्या ठिकाणी त्वरेने कोरोना संसर्गाविषयीच्या चाचणी व्हाव्यात, यासाठी दोन मोबाईल व्हॅनद्वारेदेखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. या केंद्राद्वारेही दररोज २०० हून अधिक चाचण्या होत असल्याने या प्रक्रियेला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : आयुक्त
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन वेळा आरोग्य सर्वेक्षणाद्वारे गृहभेटी देण्यात आलेल्या आहेत. लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांच्या उपचारासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवले जात आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. नागरिकांनी नियम व सूचनांचे पालन करीत महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. शहरात सुरुवातीच्या काळात तयार करण्यात आलेले बहुतांश कंटेनमेंट झोन निरस्त झाल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.
 

Web Title: Report negative on 13 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.