भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 11:33 AM2022-04-23T11:33:37+5:302022-04-23T11:37:47+5:30

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

Public service is more important than the loudspeaker politics says yashomati thakur | भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

Next

अमरावती : काही लोक विनाकारण भोंग्याचे राजकारण करून या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भोंग्यांच्या आवाजापेक्षा जनतेच्या सेवेचे आणि कामाचे अधिक महत्त्व आहे, हे यांना कधी कळणार? असा प्रश्न उपस्थित करीत अगदी राजकारण्यांचे भोंगे काढले, तर जनतेची चार कामे अधिक होतील, असे सूचक विधान पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. आजपर्यंत आपण कधीही जातीपातीत, धर्माधर्मात भेदभाव केला नाही. कोण कुठल्या जातीचे आहे, समाजाचे आहे, धर्माचे आहे, हे आपण कधीच पाहिले नाही आणि तुमच्यापैकीही कुणी असे वर्तन करीत नाही, याची मला खात्री आहे. कारण आपल्याला सर्वांच्या हिताचे आणि विकासाचे काम करायचे आहे. समाजाच्या हिताचा आणि विकासाचा विचार करताना कधीही जात आडवी येत नाही किंवा धर्म आडवा येत नाही. पण ज्यांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांना धर्माधर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

भोंग्यावरून राजकारण करून सामाजिक शांतता बिघडवायची आहे. वास्तविक अशा राजकारण्यांचे भोंगे काढून घ्यायला पाहिजेत. त्याने जनतेची चार कामे अधिक होतील, जनतेची सेवा अधिक होईल आणि कुणाला त्रास होणार नाही, असा उपरोधिक टोलाही यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगावला. सामाजिक शांतता, सलोखा आणि धार्मिक एकात्मतेला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत अमरावतीतील जनता अशा लोकांच्या कारस्थानाला बळी पडणार नाही, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला यामुळे एकाच दिवशी विविध आरोग्य तपासण्या करता आल्या. तिवसा पंचायत समितीच्या सभापती शिल्पा रवींद हांडे यांच्या पुढाकाराने हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

Web Title: Public service is more important than the loudspeaker politics says yashomati thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.