अमरावती : शहरातील शाॅपिंग माॅल सुरक्षेच्या अनुषंगाने फायर ऑडिट करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी मंगळवारी येथे दिले. पोलीस आयुक्तालयात शॉपिंग मॉलचे संचालक, व्यवस्थापकांच्या संयुक्त बैठकीत सुरक्षेच्या आढावा घेताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
पोलीस आयुक्तांनी मॉलमध्ये अचानक आग लागल्यास बाहेर पडण्याचा मार्ग ठळकपणे दिसावा, असे फलक दर्शनी भागात लावावे. नागरिकांच्या जीविताशी काळजी घेणे हे मॉल संचालकांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक मॉलचे फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. अनुचित घटना घडल्यानंतरच उपाययोजना केल्या जातात. मात्र, आता मॉलमध्ये सतत मॉक ड्रिल, स्मोक डिटेक्टर, अग्निशमन यंत्रणा तपासणी, कालबाह्य झालेल्या वीज तारा बदलविणे, मान्यताप्राप्त वीजतंत्रीकडून इलेक्ट्रिक जोडणी करणे आदी विषयांवर पोलीस आयुक्त सिंह यांनी लक्ष वेधले. फायर ऑडिटमध्ये हलगर्जीपणा केल्याचे आढळले, तर संबंधित मॉल संचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीदेखील त्यांनी बैठकीत दिली. कोरोना संसर्ग अजूनही गेला नाही. त्यामुळे मॉलमध्ये कोरोना नियमावलींचे पालन व्हावे, नागरिक, ग्राहकांची दक्षता घेण्याविषयी निर्देश देण्यात आले.