एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:01:02+5:30

शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘बफर झोन’ घोषित केला तसेच आरोग्य सेविका व आशा यांच्या दहा पथकांद्वारे तातडीने सर्र्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून या परिसरात पथकाच्या गृहभेटी सुरू झाल्या.

One sample negative; Pending another | एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित

एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचे ‘मिशन हैदरपुरा’ : इर्विन क्वारंटाइनमध्ये सात, वलगावच्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात ११ व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील हैदरपुरा भागात घोषित बफर झोनच्या दीड किमी क्षेत्रात दहा पथकांद्वारे गृहभेटी पूर्ण झालेल्या आहेत. यामध्ये कोणीही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मेरठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दाम्पत्याच्या दोन मुलांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला, तर एक अहवाल प्रलंबित आहे. सर्दी, ताप असणाºया सात व्यक्तींना इर्विन, तर ११ व्यक्तींना वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात क्वारंटाइन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘बफर झोन’ घोषित केला तसेच आरोग्य सेविका व आशा यांच्या दहा पथकांद्वारे तातडीने सर्र्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून या परिसरात पथकाच्या गृहभेटी सुरू झाल्या. सोमवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. यामध्ये ‘कोरोना’संशयित रुग्ण आढळला नसल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. हा बफर झोन आता होम क्वारंटाइन राहणार काय, या मुद्द्यावर आयुक्तांनी बोलणे टाळले. सध्या संचारबंदी असल्याने सर्व नागरिक घरीच असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मेरठ येथे बाधित आढळलेल्या रुग्णांचा संपर्क कोणाशी आला, याची कसून चौकशी सुरू आहे. या परिसरात दोन आॅटोरिक्षांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, शिवाय या भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. गृहभेटीचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष शैलेश नवाल यांना सादर केला जाईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

कंटेनमेंटमध्ये २, बफर झोनमध्ये ३ चेकपोस्ट
बफर झोन असणाºया दीड किमी परिसरात पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कुरळकर दोन दिवसांपासून या ठिकाणी भेटी देत आहेत. परिमंडळ क्रमांक २ चे उपायुक्त शशिकांत सातव यांनीही या परिसरात भेटी दिल्यात. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये दोन व बफर झोनमध्ये तीन चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. रहमतनगर, रोशननगर, हैदरपुरा व रोशननगर २ मध्ये हे पॉइंट आहेत. खोलापुरी गेटचे ठाणेदार अतुल घारपांडे व नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच १५ होमगार्ड व मुख्यालयाचे १५ पोलीस या भागावर लक्ष ठेवून आहेत.

संशयित रुग्ण कुणीही नाही. ‘त्या’ परिवारातील दोनपैकी एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आहे व दुसरा प्रलंबित आहे. १८ व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी

पथकाद्वारे या परिसरातील गृहभेटी पूर्ण झाल्यात. या विषयीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना देण्यात येईल. या भागात अधिकारी व पदाधिकाºयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका
 

Web Title: One sample negative; Pending another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.