‘कोरोना हॉटस्पॉट’मध्ये आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:08+5:30

सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी पथकांजवळ सध्या ५० पल्स ऑक्सिमीटर मशीन देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.

Now check the pulse oximeter in the corona hotspot | ‘कोरोना हॉटस्पॉट’मध्ये आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी

‘कोरोना हॉटस्पॉट’मध्ये आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्शन प्लॉन : साखळी ब्रेक करण्यासाठी जिल्हा, आरोग्य प्रशासनाच्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील मसानगंज, रतनगंज व आता फ्रेजरपुरा हे या आठवड्यात कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत. या भागातील रुग्ण ओळखता यावेत, यासाठी जोखमीच्या व्यक्तींची आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पथकाजवळ ही मशीन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी पथकांजवळ सध्या ५० पल्स ऑक्सिमीटर मशीन देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले. याव्यतिरिक्त आणखी १०० मशीन बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बरेचदा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र, त्यांच्याकडून लक्षणे लपविली जातात. अशावेळी या मशीनद्वारे चाचपणी केली जाऊ शकते. रक्तात ऑक्सीजन कॅरी करण्याची क्षमता ही १०० टक्के असते. मात्र, आॅक्सीजन सॅच्युरेशनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ही धोक्याची सूचना समजून उपाययोजना करता येऊ शकतात. याविषयीची माहिती पथकाला ‘ऑन दी स्पॉट’ मिळू शकते. कोरोनामध्ये रक्तातील ऑक्सीजन सॅच्युरेशन कमी होते. या लक्षणामुळेही हायरिस्कचे रुग्ण ओळखता येऊन वेळीच उपाययोजना करता येऊ शकतात, असे डॉ. काळे यांनी सांगितले.
वाढत्या रुग्णसंख्येत काही क्रिटिकल असल्याने आता ऑक्सीजन बेडची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या ३० बेडची व्यवस्था आहे. येथे आणखी १० बेड वाढविण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २० ऑक्सीजन बेड आहेत तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये तिवसा, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर येथेही ५ ते १० बेडची व्यवस्था असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात १५०, ग्रामीणमध्ये २०० मशीन
मोबाइल हँडसेटच्या एक चतुर्थांश आकाराची ही मशीन सर्वेक्षणादरम्यान पथकासाठी महत्त्वपूर्ण आहे. बरेचदा सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील काही व्यक्ती त्यांना असणारा त्रास व लक्षणे लपवितात. अशावेळी बोटाला ही मशीन लावून त्या व्यक्तीच्या रक्तातील आॅक्सीजनच्या सॅच्युरेशनचे प्रमाण तपासता येऊ शकते. याद्वारे संशयित रुग्णांची माहिती मिळू शकते. महापालिका क्षेत्रासाठी १५०, तर जिल्हा ग्रामीणसाठी २०० मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत. १४५० रुपये किमतीची ही मशीन असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

हायरिस्क भागातील आरोग्य पथकांजवळ आता पल्स ऑक्सिमीटर ही मशीन देण्यात येणार आहे. याद्वारे कोरोना संक्रमित व्यक्तींवर त्वरेने उपचार करता येतील. महापालिका क्षेत्रात १५० व जिल्हा ग्रामीणमध्ये २०० मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

हाताच्या बोटांना लावता येणारी ही छोटी मशीन आहे. याद्वारे व्यक्तीच्या रक्तामधील ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण ओळखता येऊ शकते. कोरोनाचे या संकटकाळात संक्रमित रुग्ण ओळखून त्यांच्यावर त्वरेने उपचार करता येऊ शकतात.
- डॉ. विशाल काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

Web Title: Now check the pulse oximeter in the corona hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.