आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 05:00 AM2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:48+5:30

राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाइव्ह मॅचवर क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करून तिघेही बुकी अनिल ऊर्फ कॉस्को मेटकर (रा. देशपांडे प्लॉट, अमरावती) या बुकीकडे लगवाडी करताना मिळून आले. यातील कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्यांचा उतारा करीत असल्याची माहिती समोर आली. तो बडा मासा सिराज असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.

Nagpur connection of IPL betting! | आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन !

आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर सट्ट्याद्वारे कोट्यवधींच्या बोली लावली जात आहेत. शहरात यासाठी सुमारे २०० पेक्षा अधिक बुकींचे जाळे कार्यरत असल्याची माहिती असून, आयपीएल सट्ट्याची तार नागपूरशी जुळली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. २८ व २९ मार्च रोजी शहर गुन्हे शाखा व पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने धाड घालून दोन ठिकाणचा आयपीएलवर चालणारा जुगार उद्ध्वस्त केला. अटक बुकींच्या चौकशीअंती ‘सिराज’ नामक बड्या माशाचे नाव समोर आले असून, तो नागपूरचा असल्याची पोलिसांची माहिती आहे.
 शहर गुन्हे शाखेच्या पथकाने  २८ मार्च रोजी रात्री नागपूर मार्गातील रहाटगाव येथे असलेल्या एका रेस्टॉरंट अँड बारमध्ये  कारवाई करीत  गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग करीत असलेल्या  अमर शिरभाते (कल्याणनगर) व राहुल नगरे ( मच्छीसाथ)  यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ६४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील शेगाव-रहाटगाव रोडवर असलेल्या वैष्णवी विहारमधून २९ मार्च रोजी रात्री सुरेंद्र साहू (३८), नीलेश साहू (४३) व लकी साहू (तिघेही रा. मसानगंज) यांना अटक करण्यात आली. 
राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाइव्ह मॅचवर क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करून तिघेही बुकी अनिल ऊर्फ कॉस्को मेटकर (रा. देशपांडे प्लॉट, अमरावती) या बुकीकडे लगवाडी करताना मिळून आले. यातील कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्यांचा उतारा करीत असल्याची माहिती समोर आली. तो बडा मासा सिराज असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणात आणखी काय बाहेर पडते, याकडे गुन्हेगारी विश्वाचेही लक्ष आहे.

अशी आहे साखळी 
सट्टा बाजारात बुकी, एजंट, सबएजंट व सट्टा लावणारे अशी साखळी असते. एजंट किंवा सबएजंट बुकिंग घेऊन बुकीला सारखे कळवत असतात. ज्या साखळीद्वारे पैसे मुख्य बुकीपर्यंत पोहोचतात, त्याच साखळीने पैसे ग्राहकापर्यंत येत असतात. एजंट, सबएजंट यांना बुकिंगच्या ५ ते १० टक्के कमिशन दिले जाते. आयपीएल फीवर सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक सामन्यावर लावल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ होत आहे.

असा खेळला जातो सट्टा
आयपीएलमधील सट्टा विजय किंवा पराजयावरच खेळला जात नाही, तर टॉसपासून प्रत्येक चेंडूवरही लावला जातो. कोणता खेळाडू किती धावा काढणार, कोणता गोलंदाज किती विकेट काढणार, कोणत्या ओव्हरमध्ये षटकार किंवा विकेट पडणार, यावरही सट्टा लागतो. याशिवाय सेशन म्हणजे १० ओव्हरमध्ये कोणत्या संघाच्या किती धावा होतील, यावरही सट्टा लावला जातो. एका सेशनमध्ये ७० धावा, असे बुकीने सांगितल्यास त्यावर ‘अप’ किंवा ‘डाऊन’ असे सांगून बोली लावली जाते. सट्ट्याचे सर्व व्यवहार फोनवरून सतत सुरू असतात. सामना जसजसा पुढे जातो, तसतसा रेटमध्येही बदल होतो.

 

Web Title: Nagpur connection of IPL betting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.