अतिक्रमणात नगरपंचायत नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:15+5:30

धारणी शहरात एकूण १७ प्रभागांमध्ये १७ नगरसेवक आहेत. आपापल्या प्रभागांत होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नगरसेवकांची आहे. मात्र, काही नगरसेवक स्वत: किंवा नातलगांच्या माध्यमाने अतिक्रमणात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येऊ नये, असाच बहुतेकांचा कटाक्ष असतो.

Nagar Panchayat Namdhari in encroachment | अतिक्रमणात नगरपंचायत नामधारी

अतिक्रमणात नगरपंचायत नामधारी

Next
ठळक मुद्देधारणी शहरात अर्थकारण फोफावले : फौजदारीच्या आदेशानंतरही बांधकाम सुरूच

श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहर सध्या पूर्णपणे अतिक्रमणात हरवून गेले आहे. पाच वर्षांत नगरपंचायतीने अतिक्रमणधारकांना सवलत दिल्याने मोकळ्या जागांवर बांधकामाचे जाळे विणण्यात आले. या जाळ्यापासून मुख्य मार्गसुद्धा सुटले नाहीत. फौजदारी आदेश देऊनही अवैध बांधकाम थांबत नसल्याने येथील नगरपंचायत नामधारी बनल्याचे चित्र आहे.
धारणी शहरात एकूण १७ प्रभागांमध्ये १७ नगरसेवक आहेत. आपापल्या प्रभागांत होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नगरसेवकांची आहे. मात्र, काही नगरसेवक स्वत: किंवा नातलगांच्या माध्यमाने अतिक्रमणात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येऊ नये, असाच बहुतेकांचा कटाक्ष असतो. शहराच्या गल्लीबोळात, चौकात इतकेच नव्हे तर मुख्य मार्गावरसुद्धा अतिक्रमणकर्ते राजरोस आपली दुकाने थाटून प्रशासनास वाकुल्या दाखवित आहेत. मुख्य मार्गाची अवस्था तर अशी की, एखाद्या दुकानात प्रवेश करताना अतिक्रमणकर्त्याच्या दुकानासमोर वाहन उभे केल्यास वाहनधारकांना ते बाजूला करण्यापर्यंत अक्षरश: शिवीगाळ केली जाते. अशा अतिक्रमणाला काही नगरसेवकच खतपाणी घालत असल्यामुळे त्यांची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र, तेथील कारभार अर्थकारण आणि राजकारण यापुरता मर्यादित झालेला आहे. सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या शहरातील अतिक्रमणाचे नगरपंचायतला सोयरसुतक नाही. प्रभारी मुख्याधिकारी आठवड्यातून दोन दिवसच धारणीत येतात. त्यामुळे त्यांच्याकडून तरी अपेक्षा ठेवावी, असा सवाल धारणीकर करीत आहे.

धारणी शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. नगरपंचायत प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस विभागांकडून अतिक्रमणधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत.
- मिताली सेठी,
सहायक जिल्हाधिकारी, धारणी

मागील आठवड्यात पहिल्यांदा धारणी शहराची पाहणी करण्यात आली. अतिक्रमण हा शहरातील प्रमुख मुद्दा असल्याचे जाणवले. हळूहळू अतिक्रमण हटविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
- सुधाकर पानझडे, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत

धारणी शहराच्या अतिक्रमणाबाबत आम्ही नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून गंभीर आहोत. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृहात आवाज उचलला. परंतु, याकडे सत्ताधारी पक्ष डोळेझाक करीत आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाईस संपूर्ण सहकार्य राहील.
- क्षमा चौकसे, विरोधी पक्षनेता, नगरपंचायत, धारणी

Web Title: Nagar Panchayat Namdhari in encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.