बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:52+5:30

बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले.

‘Muscle power’ increased in the bank, directors don’t have ‘voice’? | बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली. बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले असून, त्यांची ‘मसल पाॅवर’ वाढल्याने संचालकांना ‘व्हाईस’ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी प्रवर्गातून बॅंकेत संचालकपदाचे उमेदवार संजय खोडके यांनी शुक्रवारी येथे केला. 
४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनेलचा जाहीरनामा जाहीर करताना ते बोलत होते. संजय खोडके यांच्या मते, बॅंकेची निवडणूक महत्त्वाची नाही, तर शेतकरी वाचला पाहिजे, तो जगला पाहजे, यासाठी ही लढाई आहे. पक्ष, विचार वेगवेगळे असताना जिल्ह्यातील विविध नेते शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्षांना ईडीची नोटीस आल्याच्या प्रश्नावर संजय खोडके यांनी ‘ईडीचा ऊहापोह नको’ असे म्हणत याविषयी बोलणे टाळले. मात्र, बॅंकेत अपहार, भ्रष्टाचार झाला, हे कुणीही लपवू शकत नाही, याला त्यांनी दुजोरा दिला. आता बॅंकेत गैरव्यवहारांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले असून, दोषींना त्यांचे कर्म एक दिवस दिसून पडेल, असे संजय खोडके म्हणाले. बॅंकेच्या गैरव्यवहाराला संचालक नव्हे तर अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी  केला. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालकांची सभा पाच मिनिटांत गुंडाळली जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा सवालही खोडके यांनी उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, भाजपचे नेते, माजी आमदार अरुण अडसड, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, राजेश वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र महल्ले, माया हिवसे, रवींद्र गायगोले, सुधीर सूर्यवंशी, जयश्री देशमुख उपस्थित होते.

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड
जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला. 

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: देशमुख
जिल्हा बँकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा कारभार हा शेतकऱ्यांसाठी असावा, यासाठी ही लढाई आहे. भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: ‘Muscle power’ increased in the bank, directors don’t have ‘voice’?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.