सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:00 AM2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:29+5:30

चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.

Mrigdhara collapsed in seven talukas | सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

Next
ठळक मुद्देआनंदोत्सव : संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मृगाच्या प्रारंभीच दमदार सुरुवात, शेतकऱ्यांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाची वाट पाहणाऱ्या अमरावतीकरांना गुरुवारी मान्सूनने सुवार्ता दिली. दुपारी १२ नंतर सुमारे २ ते ३ तास दमदार पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे, दर्यापूर तालुक्यातील नदी-नाले पावसाने प्रवाही झाले. अमरावती शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. नौकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती, भातकुली, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूररेल्वे या तालु्क्यात गुरुवारी मुसळधार पावसाने खरीप हंगामाची धामधूम वाढविली. 
धामणगाव :  गुरुवारी संपूर्ण तालुक्यात  दुपारपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने नाले वाहू लागले आहेत.  विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार सुरुवात केली.  काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुरू केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने ते पेरणीविनाच परतले. धामणगावात दमदार पाऊस आल्याने बळीराजा सुखावला.  पहिल्यांदाच काही भागातील नाल्यांना पूर आला. आगामी तीन दिवस पावसाचे असल्याने तसेच जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी दिली. 
तिवसा : शहरात गुरुवारी दुपारी १२.२० वाजता वादळी पाऊस कोसळला. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदला आहे. सुमारे दोन तास पाऊस कोसळला. 
चांदूूररेल्वे : गुरुवारी अचानक बरसलेल्या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरले होते. काही भागात  नाल्यातील पाणी अनेक ठिकाणी अडल्याने ते पाणी सखल भागात शिरले. काही नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षांनी स्वतः नाल्यांमध्ये जेसीबीच्या साह्याने तुडुंब भरलेले नाले मोकळे केले. 
वरूड : तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दर्यापूर तालुक्यात देखील दुपारनंतर अर्धा तास मान्सूनच्या सरी कोसळल्या.
भातकुली : तालुक्यातील रामा, टाकरखेडा संभू, अळणगाव, गोपगव्हाण, निंभा, खारतळेगाव, वाठोडा भागात मृगधारा कोसळल्या. उर्विरत गावात ढगाळ वातावरण आहे.
चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.
 

दर्यापुरात मुसळधार पाऊस बरसला
दर्यापूर :  तालुक्यात १८  तासात दोनदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री ९ वाजता दरम्यान तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. गुरुवारी दुपारी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली. गुरुवारी दुपारी शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती.

शहरात धुवांधार
शहरात दुपारी १२ ते २ या कालावधीत संततधार कोसळली. त्यामुळे अंबा नाला प्रवाही झाला. तर, चौधरी चौकातील रामलक्ष्मण संकुल,  मालविय चौकातील उड्डाणपुलालगतच्या भागातील सखल भागात पाणी साचले.

मोती कोळसा नदीला पूर
तळेगाव दशासर : गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तीन तास सारखा दमदार पाऊस कोसळल्याने तळेगाव येथील मोती कोळसा नदीला पूर आला होता.

जळू येथे वीज कोसळून तीन जनावरे दगावली
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात बुधवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान जोरदार पाऊस कोसळला. जळू येथे दुपारी ३ च्या सुमारास वीज कोसळून तीन गाई दगावल्या. जळू येथील मनोहर गायकी हे गुरे चारून गावाकडे येत असताना पाऊस सुरू झाल्याने गावामागील वडाच्या झाडाखाली गाई थांबल्या. तेथे वीज कोसळल्याने तीन गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने मनोहर हे तेथून घरी आल्याने वाचले. याशिवाय येणस-काणस शिवारात लिंबाच्या आकाराची गार पडली. यामुळे आंबिया बहराची संत्री गळाली. या परिसरात वादळी पाऊस झाल्याने शेताचे बांध फुटले व कपाशीचे लागवड केलेले बियाणे मातीखाली दडपले, असे येणस येथील शेतकरी मनोज कडू यांनी सांगितले.

 

Web Title: Mrigdhara collapsed in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.