Molestation of woman | विद्यार्थिनीचा विनयभंग, सख्याहरीला चोप
विद्यार्थिनीचा विनयभंग, सख्याहरीला चोप

ठळक मुद्देनागरिकांची ठाण्यावर धडक : इदगाह परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शिकवणी वर्ग संपल्यावर सायकलने धोतरखेडा येथे जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा सख्याहरीने पाठलाग करून विनयभंग केला. त्या विद्यार्थिने त्याचा प्रतिकार करीत आरडाओरड केल्यावरून नागरिकांनी त्या रोडरोमिओला पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी परतवाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. रंगोली लॉनजवळील इदगाह परिसरात १५ जून रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
शेख राजा शेख सलाम (३०, मुगलाईपुरा, परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गुजरी बाजार चौकात भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३५४, ३५४ अ, ३२३,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली, तर अन्य दोघांविरुद्ध १५१ अन्वये कारवाई करण्यात आली. परतवाडा धामणगाव मार्गावरील नर्सरीनजीक तिला थांबवून अश्लील भाषेत तो बोलला. विद्यार्थिनीने प्रतिकार केल्याने त्यांच्यात लोंबाझोंबी झाली. कशीबशी सुटका करून पळू लागली. हे पाहून आरोपीने तिला दगड फेकून मारला. तो दगड हातावर लागल्याने ती रक्तबंबाळ झाली.जखमी अवस्थेत तिने नागरिकांची मदत मागितली. नागरिकांनी आरोपीची धुलाई केली.
मजनंूचा बंदोबस्त करा
शहरालगतच्या परिसरातील खेड्यांतून विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालय व शिकवणीसाठी परतवाड्यात येतात. काही कापड व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठान, दवाखाने आदी ठिकाणी काम करण्यासाठी येतात. त्या महिला -मुलींच्या ये-जा करण्याच्या वेळेत हे टवाळखोर त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असल्याच्या घटना शहरात वाढत आहे. रस्त्यावरून एकट्या मुलीला ओढत नेण्यापर्यंत त्या टवाळखोरांची मजल गेली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिक ठाण्यावर
सदर मुलीने परतवाडा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. नागरिकांचा लोंढा ठाण्याकडे जात असल्याचे पाहून शहरातील इतर नागरिक ठाण्यावर धडकले. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली.


Web Title: Molestation of woman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.