मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:46 PM2019-07-15T18:46:33+5:302019-07-15T18:47:30+5:30

मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

Melghat's Bamboo Rakhi will be go to abroad | मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

googlenewsNext

- पंकज लायदे

अमरावती - मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्रात यंदा नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये 'राखी महोत्सव'देखील साजरा केला जाणार आहे. मेळघाटातील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांच्या कौशल्याने तब्बल सव्वा लाख बांबू राख्या आकारास आल्या आहेत.

धारणी तालुक्यातील लवादा येथे २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत संपूर्ण बांबू केंद्राने 'बांबू राखी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मेळघाटातील बांबू वापरून येथीलच आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या राख्या राज्यात आणि देशात उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनेही या संकल्पनेचे स्वागत केले असून, परिषदेच्या मदतीने विविध ३७ देशांमध्ये ही बांबू राखी पोहचविली जाणार आहे.


 
सव्वा लाख राख्या 
महाराष्ट्रातील चार मोठ्या शहरांमध्ये यंदा राखी महोत्सव केला जाणार आहे. त्यातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर येईल. सुमारे सव्वा लाख बांबू राख्या तयार करण्यात आल्या आहेत. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना होईल. 
 
विद्यार्थ्यांना किट्स
संपूर्ण बांबू केंद्राने राखी बनविण्याच्या ५० हजार किट्स उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील एक हजार शाळांशी संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहचविण्याचा आमचा विचार आहे, असे सुनील देशपांडे यांनी सांगितले.
 
राखीचा ब्रँड महिला कारागिरांच्या नावे
सुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार केलेल्या राख्यांना त्या महिला कारागिरांची तसेच पुरुष कारागिराच्या पत्नीचे नाव ब्रँडकरिता देण्यात आले. पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मेळघाटातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. तथापि, राखीमुळे सुमारे सात गावांमधील महिलांना स्थलांतर झालेले नाही. संपूर्णत: नैसर्गिक असलेली ही राखी महिलांना स्वाभिमानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन ठरली आहे.

Web Title: Melghat's Bamboo Rakhi will be go to abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.