तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:09+5:302021-05-09T04:14:09+5:30

फोटो पी ०८ पालकमंत्री फोल्डर अमरावती : ग्रामीण भागात कोविड संक्रमितांची संख्या वाढत असून, तिसऱ्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण ...

Make every effort to prevent the threat of a third wave | तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा

तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा

Next

फोटो पी ०८ पालकमंत्री फोल्डर

अमरावती : ग्रामीण भागात कोविड संक्रमितांची संख्या वाढत असून, तिसऱ्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. हे वेळीच रोखणे गरजेचे आहे. उपचार यंत्रणा अधिक सुसज्ज करतानाच, साथीचे गांभीर्य दुर्लक्षित करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी तिवसा येथे दिले.

तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरची, तसेच नियोजित ऑक्सिजन प्लांटच्या जागेची पाहणी पालकमंत्र्यांनी शनिवारी केली. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तालुका यंत्रणेची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. तिवस्याचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, ठाणेदार रिता उईके, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे-देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळणे, परवानगी नसलेली दुकाने खुली असणे, गर्दी होणे, मास्क व इतर नियम न पाळणे असे प्रकार अजूनही काही बेजबाबदार लोकांकडून घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. स्वतःसह इतरांनाही जोखमीत टाकणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. ग्रामस्तरीय समित्यांची काटेकोर देखरेख असावी. पोलीस यंत्रणेने त्यांना सहकार्य करावे. तिवसा उपजिल्हा रुग्णालयात सध्या ७० खाटा उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार खाटा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर, रुग्णालयाला आवश्यक ती सर्व सामग्री मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गृहविलगीकरणातील व्यक्तीकडून नियमभंग होत असल्यास २५ हजार दंडाची तरतूद आहे. ग्रामस्तरीय समित्यांच्या समन्वयाने कारवायांना गती देण्यात आल्याची माहिती तहसीलदार फरतारे यांनी दिली.

बॉक्स

तालुक्यात २, ०२४ बाधीत

तिवसा नगरपंचायतीचे क्षेत्र कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले असून, आतापर्यंत तालुक्यात २ हजार २४ बाधित आढळले व आजमितीला तालुक्यात ४५५ व तिवसा नगरपंचायत क्षेत्रात १०१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत १४ हजार १७९ तपासण्या झाल्या आहेत. तालुक्यात चाचणीसाठी ७० गावांत चाचणी मोहीम राबविण्यात आली. कोविड हेल्थ सेंटरमध्ये जंबो सिलेंडरद्वारे सेंट्रल ऑक्सिजन लाईन उपलब्ध आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी पोटपिटे- देशमुख यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांचाही आढावा

तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी तालुका प्रशासनाकडून घेतला. पावसाळ्यापूर्वी पांदणरस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील २० दिवसांत सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठलीही कारणे खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. आपण स्वतः पांदणरस्त्यांची पाहणी करू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Make every effort to prevent the threat of a third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.