Maharashtra Election 2019 ; यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रवि राणा, बच्चू कडू यांनी रचला इतिहास; शिवसेनेचा धुव्वा, भाजपची स्थिती लाजीरवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:46+5:30

सर्वाधिक धक्कादायक नोंद कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पराभवाची झाली. महाआघाडी समर्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात भाजपचे हेवीवेट उमेदवार अनिल बोंडे यांना पराभूत केले. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी हॅट्ट्रिक साधत काँग्रेसचे वैभव कायम राखले. येथे सेनेचे राजेश वानखडे यांनी निकराची झुंज दिली. ठाकूर यांच्या विकासकामांवर मतदारांनी मोहर लावली.

Maharashtra Election 2019 ; History composed by Yashomati Thakur, Sulbha Khodke, Ravi Rana, Bachchu Kadu; Shiv Sena's washout, BJP's shame on the situation | Maharashtra Election 2019 ; यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रवि राणा, बच्चू कडू यांनी रचला इतिहास; शिवसेनेचा धुव्वा, भाजपची स्थिती लाजीरवाणी

Maharashtra Election 2019 ; यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रवि राणा, बच्चू कडू यांनी रचला इतिहास; शिवसेनेचा धुव्वा, भाजपची स्थिती लाजीरवाणी

Next
ठळक मुद्देभाजप-सेना एकवटूनही रवि राणांची 'हॅट्ट्रिक'नवख्या युवकाने केला कृषिमंत्र्याचा पराभवमेळघाटात राजकुमार पटेलांचा एकतर्फी विजयअमरावतीला मिळाल्या पहिल्या महिला आमदारप्रताप अडसडांनी रोखला काँग्रेसचा रथ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सत्तेतील भाजप- शिवसेनेला धक्के देणारा निकाल जिल्ह्यातील मतदारांनी दिला. काँग्रेसच्या जागांमध्ये एकाने वाढ झाली असून, शिवसेनेचा तिन्ही जागांवर धुव्वा उडाला. नवख्या युवकाने कृषिमंत्र्यांना अस्मान दाखविले आणि हातच्या तीन जागा गमविल्याने भाजपची स्थिती लाजीरवाणी झाली आहे. अपक्षांनी कमाल केली. आठपैकी चक्क चार मतदारसंघातून अपक्षांना मतदारांनी विधिमंडळात पाठविले.
सर्वाधिक धक्कादायक नोंद कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पराभवाची झाली. महाआघाडी समर्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात भाजपचे हेवीवेट उमेदवार अनिल बोंडे यांना पराभूत केले.
तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी हॅट्ट्रिक साधत काँग्रेसचे वैभव कायम राखले. येथे सेनेचे राजेश वानखडे यांनी निकराची झुंज दिली. ठाकूर यांच्या विकासकामांवर मतदारांनी मोहर लावली.
अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी शानदार विजय मिळविला. अमरावती मतदारसंघातील त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. मुस्लिमबहुल भागांतील पाच फेऱ्यांमध्ये त्यांनी निर्णायक आघाडी मिळविली. तब्बल १६ फेऱ्यांमध्ये भाजपचे सुनील देशमुख समोर असतानाही त्यांना ही आघाडी शेवटपर्यंत तोडता आलेली नाही.
बडनेरा मतदारसंघात अपक्ष आमदार रवि राणा यांची जादू पुन्हा चालली. शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्याशी अटीतटीची लढत झाली. सेना-भाजपने राणांना हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, राणांनीच सर्वांना पुन्हा एकदा हरविले. राणांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. सहा फेऱ्यांमध्ये बंड यांनीदेखील आघाडी घेतली; परंतु राणाच बाजीगर ठरले.
अचलपूर मतदारसंघात अपक्ष (प्रहार) बच्चू कडू यांनी सलग चौथ्या विजयाची ऐतिहासिक नोंद केली. येथे काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांनी कडवी झुंज दिली. अर्ध्याअधिक फेऱ्यांमध्ये देशमुख आघाडीवर होते. मात्र, बच्चू कडूंच्या करिष्म्याला ते रोखू शकले नाहीत.
मेळघाटात राजकुमार पटेल (प्रहार) यांनी कमाल केली. येथे भाजपचे रमेश मावस्कर व राष्ट्रवादीचे केवलराम काळे यांना बरेच मागे सोडून त्यांनी एकतर्फी विजय संपादन केला.
दर्यापूर मतदारसंघातील लढतीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा दमदार विजय झाला. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांचा पराभव केला.
धामणगाव मतदारसंघात भाजपचे प्रताप अडसड यांनी काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा विजयरथ रोखला. चुरशीच्या लढतीत अडसडांनी भाजपची लाज राखली.


काँग्रेसचे होमवर्क अन् टीम वर्कचा करिष्मा
अमरावती मतदारसंघात महाआघाडीने तीन महिन्यांपासून नियोजनपूर्वक काम केले. भाजपचे सुनील देशमुख यांचे कच्चे दुवे हेरले. सुलभा खोडके यांच्या विजयाने संजय खोडके व सहकाऱ्यांचे परिश्रम सार्थकी लागले.
तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनी एकहाती किल्ला लढविला. जनसंपर्कातील सातत्य, युती शासनाविरोधात सातत्याने घेतलेली भूमिका मतदारांना भावली. दर्यापूर मतदारसंघात रिपाइंचे बळवंत वानखडे यांना आपल्या खेम्यात घेत काँग्रेसने महायुतीचा गड हिरावला व पकड निर्माण केली.

अपक्ष बाजीगर अर्धा जिल्हा बळकवला
जिल्ह्यात आठ मतदारसंघांपैकी चार ठिकाणी विजय खेचत अपक्ष उमेदवारांनी २०१४ च्या तुलनेत यंदा दुप्पट म्हणजे चार मतदारसंघांमध्ये बाजी मारली. ऐनवेळी राजकुमार पटेल यांना सोबत घेत मेळघाट व अचलपूर मतदारसंघ बच्चू कडूंनी राखले.
बडनेरात राणा दाम्पत्याने दबदबा कायम राखला. रवि राणा यांनी एकहाती किल्ला लढविला. अनेक विरोधकांना नामोहरम करीत ते बाजीगर ठरले, तर अचलपुरात जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी हेवीवेट उमेदवार अनिल बोंडे यांच्या विरोधकांची मोट बांधून इतिहास घडविला.

महायुतीला नडला अतिआत्मविश्वास
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपक्षाने पाच जागी उमेदवार उभे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारसभा झाल्यात. मात्र, उमेदवार अन् स्थानिक पदाधिकाऱ्यांचा गुंता अखेरपर्यंत सुटलाच नाही. परिणामी एकच जागा पदरी पडली.
शिवसेनेकडून तीन मतदारसंघांत उमेदवार लढले. उद्धव ठाकरे व अरविंद सावंत यांच्या सभा झाल्या. बडनेºयात प्रीती बंड अन् तिवस्यात राजेश वानखडे यांनी निकराची झुंज दिली; मात्र हा संघर्ष विजयात परिवर्तीत झालेला नाही.

या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
काँग्रेसने पाच जागा लढविल्या, यापैकी अमरावती, तिवसा व दर्यापूर मतदारसंघात विजय मिळवित २०१४ च्या तुलनेत एक जागा वाढविली.
भाजपने पाच जागा लढविल्यापैकी धामणगाव या एकाच ठिकाणी विजय मिळाला. २०१४ च्या तुलनेत तीन जागा कमी.
अपक्षांनी बडनेरा, अचलपूर, मेळघाट व मोर्शी येथे विजय मिळविला. २०१४ मध्ये दोन जागा होत्या. त्यात आणखी दोन जागांची भर पडली

पक्षनिहाय जिल्हास्थिती
तिवसा, अमरावती व दर्यापूर मतदारसंघात काँग्रेस. बडनेरा, अचलपूर, वरूड व मेळघाट येथे अपक्ष. धामणगाव मतदारसंघात भाजप विजयी. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस निरंक.

Web Title: Maharashtra Election 2019 ; History composed by Yashomati Thakur, Sulbha Khodke, Ravi Rana, Bachchu Kadu; Shiv Sena's washout, BJP's shame on the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.