यशवंत मनोहर यांच्या भूमिकेला साहित्यिकांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:12 AM2021-01-18T04:12:34+5:302021-01-18T04:12:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारत घेतलेल्या भूमिकेला येथील ...

Literary support for the role of Yashwant Manohar | यशवंत मनोहर यांच्या भूमिकेला साहित्यिकांचा पाठिंबा

यशवंत मनोहर यांच्या भूमिकेला साहित्यिकांचा पाठिंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारत घेतलेल्या भूमिकेला येथील साहित्यिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रगतीशील लेखक संघाच्या येथील रेल्वे स्थानकासमोरील ऊर्जा भवनात रविवारी झालेल्या बैठकीत याबाबत ठराव घेण्यात आला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने कृषी कायद्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन लेखक संघाकडून केले जाणार आहे.

कोरोनामुळे तब्बल एक वर्षांनी प्रगतीशील लेखक संघाची बैठक पार पडली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरस्वती पूजन असल्याने मनोहर यांनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रगतीशील लेखक संघाने यशवंत मनोहर यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर तशा आशयाचा ठरावही करण्यात आला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्राचार्य काशिनाथ बऱ्हाटे, सचिव प्रसनेजित तेलंग, विदर्भ संघटक प्रवीण बनसोड, सुधाकर डेहनकर, शिवा प्रधान, मंगेश भुताडे, धनंजय मस्के, सारिका उबाळे, भूमिका वानखडे, संजय घरडे, भगवान फाळके, संजय शेंडे, प्रेमदास वाडकर, प्रेमानंद गडपायले, अतुल खडसे, लक्ष्मण धाकडे, नीळकंठ ढोके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

--------------------------

कृषी कायद्यावर चर्चासत्र

देशात शेतीत होत असलेल्या बदलाची सर्वप्रथम चर्चा विदर्भात होते. नवीन कृषी कायद्यांना घेऊन दिल्लीत दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना विदर्भात अपेक्षेप्रमाणे चर्चा, आंदोलन होताना दिसून येत नाही. शेतकरी आंदोलन, कृषी कायद्याबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. या चर्चासत्रातील वक्ते निश्चित करण्याबाबत चर्चासत्राचे आयोजन करत शेतकरी आंदोलनाची भूमिका प्रगतीशील लेखक संघाकडून मांडली जाणार आहे.

Web Title: Literary support for the role of Yashwant Manohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.