अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एसपींची कल्पकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:01:06+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. बॅनर व पत्रकांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देण्यात आली.

The ingenuity of the SP to eradicate superstition | अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एसपींची कल्पकता

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एसपींची कल्पकता

Next
ठळक मुद्देमेळघाटात ट्रॅकिंग मोहीम, हरिबालाजी एन. यांचा आदिवासी बांधवांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/चुरणी/चिखलदरा : मेळघाटातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हा पोलीस दलाने ट्रेकिंग मोहीम हाती घेतली आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व उपवनसंरक्षक शिवाबाला एस. यांनी शुक्रवारी काटकुंभ व चुरणी येथून या मोहिमेला सुरुवात केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. बॅनर व पत्रकांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देण्यात आली. अघोरी प्रथांमुळे गुन्हे दाखल होऊ शकतात. हे लक्षात घेऊन मेळघाटातील अघोरी व चुकीच्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रबोधन करणारे व्हिडीओ तयार करून ते मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले. त्यांच्यासह व सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवाबाला एस. हे बिच्छुखेडा, हतरू, जारिदा, बोरदा, बारुगव्हाण या भागात जाऊन दोन दिवस अंधश्रद्धेबाबत जागर करणार आहेत.
काटकुंभ व चुरणी येथील मोहिमेवेळी चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे, वनाधिकारी के.एस. पाटील, सहायक उपनिरीक्षक सुरेश लाखोडे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष वरघट, रूपेश शिंगणे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या ट्रेकिंग मोहिमेत पोलीस अधीक्षक ३५ किलोमीटर पायी चालले, तर १६० किमी प्रवास वाहनांद्वारे केला.

समूळ उच्चाटन गरजेचे
मेळघाटात आजही ‘दम्मा’सारखी पद्धत अंगीकारून लहानग्यांना गरम सळईचे चटके दिले जातात. असे भगत, भूमका आदिवासींमध्ये दहशत, भीती निर्माण करतात. डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांची फसवणूक करतात. या प्रथेचे समूळ उच्चाटन गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.

चिखलदरा पोलीस ठाण्यात जून महिन्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. अंधश्रद्धेचा पगडा असणाºया मेळघाटातील अघोरी प्रथा बंद झाल्या पाहिजे, या जाणिवेतून दोन दिवस ट्रेकिंग मोहीम घेतली आहे.
- हरिबालाजी एन.
जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: The ingenuity of the SP to eradicate superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस