Gram Panchayat resolution rests on terror | बिबट्याची दहशत कायम ग्रामपंचायतीने केला ठराव

बिबट्याची दहशत कायम ग्रामपंचायतीने केला ठराव

ठळक मुद्देशेतीची कामे ठप्प : शेंदूरजना येथे वनविभागाने लावले ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : सात दिवसांपासून तालुक्यातील गव्हा फरकाडे, शेंदूरजना खुर्द पंचक्रोशीतील अनेकांना दृष्टीस पडलेला बिबट सोमवारीसुद्धा दिसून आल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प झाली आहे. दरम्यान या या बिबट्याला जेरबंद करण्याचा ठराव शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने सोमवारी घेतला. जंगल परिसरात वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सात दिवसांपासून कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्रीत ओलित करण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली आहे. दिवसभर बिबट्याच्या दहशतीमुळे महिला मजूर शेतात जात नाहीत. या भागात वनविभागाने सोमवारी दोन कॅमेरे लावले आहेत. मोती कोळसा नदीच्या परिसरात बिबट दररोज आढळत असल्याने या भागात सतर्कतेचे आदेश वनविभागाने दिले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने मासिक सभा घेऊन या बिबट्याला जेरबंद करावा, अशा मागणीचा ठराव घेऊन वनविभागाला पाठविला आहे. कामनापूर येथून शेंदूरजनाखुर्द येथील शाळेत येणारे अनेक विद्यार्थी सोमवारी आले नाहीत. गत आठवड्यात वनविभागाला बिबट्याचे ठसे मिळाले आहे.

शेतात जातांना मजुरांनी चार ते पाचच्या संख्येने शेतात जावे. घाबरण्याचे काही कारण नाही. वन विभागाने चार वनरक्षकांची गस्त त्या भागात लावली आहे.
- आशिष कोकाटे,वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदुर रेल्वे

सात दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याची दहशत आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करून त्या बिबट्याला जेरबंद करावे. तसा ठरावच सोमवारी स्थानिक ग्रामपंचायतने मंजूर केला.
- अजय देशमुख, उपसरपंच, शेंदूरजना खुर्द
 

Web Title: Gram Panchayat resolution rests on terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.