First cancellation of Mumbai Special Express, then start order | मुंंबई विशेष एक्स्प्रेसचे अगोदर रद्द, नंतर प्रारंभचे आदेश

मुंंबई विशेष एक्स्प्रेसचे अगोदर रद्द, नंतर प्रारंभचे आदेश

अमरावती : २५ जानेवारीपासून सुरू होणारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द होणार असल्याबाबत वरिष्ठांनी गुरुवारी पाठविलेल्या आदेशाने स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांत एकच खळबळ उडाली. मात्र, दोन तासांतच नवीन आदेश धडकले आणि मुंबई विशेष एक्सप्रेस २५ जानेवारीपासून नियोजित वेळापत्रकानुसार धावणार असे स्पष्ट झाले. शुक्रवार, २२ जानेवारीपासून आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मध्य रेल्वे मुख्यालयाचे एसटीएम पी.एन. रामचंद्रन यांनी २१ जानेवारी रोजी जारी केलेल्या कोचिंग अधिसूचना ४४/२०२१ नुसार सीएसएमटी- अमरावती (गाडी क्रमांक ०२१११/०२११२) ही विशेष गाडी १९ जानेवारी रोजी रद्द करण्याचे आदेश जारी केले होते आणि याची अधिसूचना २१ जानेवारी रोजी रेल्वे स्थानक प्रंबधकांना पाठविली. एकीकडे १० महिन्यांपासून अमरावती- मुंबई एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा असताना अचानक रद्द होत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. पी.एन. रामचंद्रन यांच्या स्वाक्षरीच्या आदेशाची प्रतदेखील हाती लागली. त्यामुळे लाेकप्रतिनिधींसह प्रवाशांमध्ये असंतोष उफाळला होता.

त्यानंतर दोन तासांतच कोचींग नोटिफिकेशन ४५/२०२१ अन्वये सीएसएमटी- अमरावती विशेष रेल्वे पूर्ववत सुरु राहणार असल्याचे आदेश पी.एन. रामचंद्रन यांनी निर्गमित केले. ही विशेष गाडी २५ जानेवारी रोजी मुंबई येथून सुटणार असून, २६ जानेवारी रोजी अमरावती येथे पोहचणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना होईल. असे नव्या आदेशात म्हटले आहे.

--------------

बॉक्स

मुंबई एक्सप्रेसचे आजपासून आरक्षण

अमरावती-मुंबई एक्सप्रेस ही विशेष गाडी २२ डब्यांची असणार आहे. या गाडीचे आरक्षण २२ जानेवारीपासून प्रारंभ हाेणार असून, प्रवाशांना खिडक्यांवर आरक्षण मिळेल, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई एक्सप्रेस अगोदर सुरु नंतर रद्द आिण पुन्हा सुरु करण्याबाबत ‘राज’कारण झाल्याची चर्चा रंगली. नेमके कोणाच्या दबावाने २५ जानेवारीपासून सुरु होणारी मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्याचे आदेश जारी केले, हा विषय संशोधनाचा ठरणारा आहे.

Web Title: First cancellation of Mumbai Special Express, then start order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.