अमरावती जिल्हा बँकेतील आर्थिक फसवणुकीचा तपास ‘इओडब्ल्यू’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:10 AM2021-06-17T04:10:36+5:302021-06-17T04:10:36+5:30

लोकमत न्युज नेटवर्क अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करताना संबधितांना ...

EOW to probe financial fraud in Amravati District Bank | अमरावती जिल्हा बँकेतील आर्थिक फसवणुकीचा तपास ‘इओडब्ल्यू’कडे

अमरावती जिल्हा बँकेतील आर्थिक फसवणुकीचा तपास ‘इओडब्ल्यू’कडे

Next

लोकमत न्युज नेटवर्क

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करताना संबधितांना तब्बल ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली अदा करण्यात आली. या प्रकरणात मंगळवारी शहर कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार अधिकारी, कर्मचारी व शेअर मार्केटशी संबंधित सहा अशा एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदविला. हे प्रकरण आर्थिक अनियमिततेचे असल्याने १६ जून रोजी पुढील तपासासाठी ‘इओडब्ल्यू’ अर्थात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांकडून मिळाले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे करणार आहेत. तत्पूर्वी, गुरुवारी शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजांची तपासणी करून हे प्रकरण वरिष्ठांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्यामार्फत आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. बुधवारी त्या संबंधीचा दस्तावेज आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुरुवारी अधिकृतरीत्या हे प्रकरण ईओडब्ल्यूकडे जाईल.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ ते २०२० या काळात निप्पोन कंपनीच्या म्युच्युअल फंडात एकूण ७०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली. बॅंक आणि सदर कंपनीत थेट व्यवहार झाला असताना देखील या व्यवहारात ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आल्याचे बॅंकेने केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आले होते. त्यातच बॅंकेचा बनावट शिक्का वापरण्यात आल्याचे निरिक्षणही नोंदविले गेले होते. प्राथमिक चौकशीअंती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी. राठोड यांच्यासह ११ जणांविरूद्ध तक्रार नोंदविली. त्यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स

बँकेत स्मशानशांतता

इर्विन चौकस्थित जिल्हा बँकेत बुधवारी स्मशानशांतता आढळून आली. बापरे, एवढा मोठा फ्रॉड? कुणी केला असेल, कुणी घेतले असेल एवढे पैैसे, अशी कुजबुज एैकायला मिळाली. तर, बँकेतील संबंधितांनी बँकेचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली. एकंदरितच बँक परिसरात चर्चेची गु-हाळे रंगविण्यात आली. दरम्यान, गुन्हे दाखल झालेल्या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड चालविल्याची माहिती आहे.

कोट

अमरावती जिल्हा सहकारी बँकेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येईल. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

भारत गायकवाड,

सहायक पोलीस आयुक्त, राजापेठ झोन

शहर कोतवाली, अमरावती

Web Title: EOW to probe financial fraud in Amravati District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.