महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:57+5:30

महापौरपदासाठी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदासाठी कुसुम साहू यांचे नाव भाजपने निश्चित केले. परंतु, या दोघांनाही नगरसेवक असताना विविध पदे मिळाल्याची तीव्र भावना निष्ठावंत भाजप नगरसेवकांच्या आहेत. भाजपच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या संघटनात्मक बैठकीत निष्ठावंत नगरसेवकांनी वरिष्ठांसमक्ष यासंदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

Election of Mayor, Deputy Mayor today | महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आज

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आज

Next
ठळक मुद्देअसंतोषाकडे लक्ष : सोशल मीडियावर नेत्यांविरुद्ध रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यापूर्वी सत्ताधारी भाजपने निश्चित केलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांवर निष्ठावंत नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. काहींनी सोशल मीडियावर नेत्यांविरोधात मेसेज टाकले. यामुळे ‘कुछ तो गडबड है’ असे चित्र निर्माण केले आहे.
महापौरपदासाठी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदासाठी कुसुम साहू यांचे नाव भाजपने निश्चित केले. परंतु, या दोघांनाही नगरसेवक असताना विविध पदे मिळाल्याची तीव्र भावना निष्ठावंत भाजप नगरसेवकांच्या आहेत. भाजपच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या संघटनात्मक बैठकीत निष्ठावंत नगरसेवकांनी वरिष्ठांसमक्ष यासंदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यात सचिन रासने, चंद्रकांत बोमरे, विवेक कलोती, राधा कुरील, सोनाली करेसिया, सुचिता बिरे, सुनंदा खरड, धीरज हिवसे हे आघाडीवर होते, हे विशेष. यापूर्वी महापौरपद अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी संजय नवरणे यांची पदावर वर्णी लागली होती. मात्र, सव्वा वर्षाचा ‘फॉर्म्यूला’ पाळला गेला नाही, अशी खदखद नगरसेवक विजय वानखडे, राधा कुरील, अजय गोंडाणे यांच्या मनात आजही आहे. महापालिकेत भाजपच्या निष्ठावंतांना डावलून ‘आयाराम’ला संधी दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या आहेत. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये ‘आॅलबेल’ नाही, असे तूर्तास चित्र आहे. आता हे निष्ठावंत व्हीप झुगारतात की पाळतात, याकडे नजरा लागल्या आहेत.

पक्षीय बलाबल
महापालिकेत सत्ताधारी भाजपचे ४५ सदस्य आहेत. युवा स्वाभिमान पार्टीचे ३ व रिपाइं (आठवले गट) १ अशी एकूण ४९ सदस्यसंख्या भाजपकडे आहे. विरोधी गटातील काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना ७, बसपा ५ असे पक्षीय बलाबल आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ४४ सदस्यसंख्या भाजपकडे उपलब्ध आहे.

Web Title: Election of Mayor, Deputy Mayor today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.