'काँग्रेस पक्ष समुद्रासारखा, आगामी काळात काँग्रेसमध्ये अनेक बदल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:35 PM2019-07-25T20:35:53+5:302019-07-25T20:37:03+5:30

'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट

'Congress party like sea, many changes in Congress in coming days' says by yashomati thakur | 'काँग्रेस पक्ष समुद्रासारखा, आगामी काळात काँग्रेसमध्ये अनेक बदल'

'काँग्रेस पक्ष समुद्रासारखा, आगामी काळात काँग्रेसमध्ये अनेक बदल'

googlenewsNext

अमरावती : आगामी काळात राज्यातील काँग्रेसमध्ये बरेच बदल दिसतील. गरजेनुसार पक्षसंघटनेत बदल होत राहतील, अशा शब्दांत आमदार यशोमती ठाकूर यांनी पक्षसंघटनेतील अपेक्षित घडामोडींचे संकेत दिले. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. विधानसभा निवडणूक, नवी जबाबदारी आणि आव्हानांबाबत त्यांनी मनमोकळी चर्चा केली. अडचणीच्या काळात माझ्या खांद्यांवर जबाबदारी आली आहे. निवड होईपर्यंत मला त्याबाबतची कल्पनाही नव्हती. पक्षसंघटनेत वेगाने आणि प्रभावीपणे कामे व्हावीत, असा या कार्याध्यक्ष निवडीमागे हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस राष्ट्रसंतांच्या ‘आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी’ या विचारांचा पाईक आहे. १९७८ मध्येही काँग्रेस संपल्याची ओरड झाली होती; मात्र, भारतीय संविधानाशी बांधीलकी ठेवणारा काँग्रेस पक्ष हा समुद्रासारखा आहे. तो संपणार नाही. काँग्रेस पक्षाच्या प्रगतीचे दिवस आता सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा विजयी ध्वज लहरेलच, असा दृढ विश्वास काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

चांद्रयान मोहिमेचे श्रेय भाजप घेत असले तरी त्याचा पाया काँग्रेसनेच रचला. प्रचारात आम्ही मागे पडलो. सोशल मीडियात मागे पडलो. आता त्याही उणिवा आम्ही भरून काढू. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपकडून कळत-नकळत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. काँग्रेसचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नाकारून इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा मुद्दा खेदजनक असल्याचे त्या म्हणाल्या. 

महिलांनी ताकदीने उभे राहण्याची गरज
अद्यापही ९० टक्के महिला ‘चूल आणि मूल’ यातच अडकल्या आहेत. त्यातून बाहेर पडत महिलांनी वास्तविक जगाशी नाळ जोडावी. त्यांनी ताकदीने उभे राहायलाच हवे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी तमाम महिलांना केले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत कार्याध्यक्ष असलेल्या आणि विदर्भातून आमदार असलेल्या त्या एकमेव महिला आहेत.

Web Title: 'Congress party like sea, many changes in Congress in coming days' says by yashomati thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.