कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:12 PM2018-12-02T17:12:32+5:302018-12-02T17:14:43+5:30

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील नायक जब्या हा एका काळ्या चिमणीच्या शोधात असतो.

black sparrow found in forest of chikhaldhara | कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी'

कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी'

googlenewsNext

नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : इवल्याशा कोळी अर्थात कातिणीच्या जाळ्यात चक्क देवचिमणी अडकल्याचे नवल मेळघाटच्या सेमाडोह जंगलात आढळून आले. देवचिमणी म्हणजे काळी चिमणी होय. फँड्री चित्रपटातील जब्या ज्या चिमणीच्या शोधात होता, तीच ही चिमणी. कातिणीला मोठी शिकार मिळल्याची ही घटना विरळच असल्याचे काही पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील नायक जब्या हा एका काळ्या चिमणीच्या शोधात असतो. ती काळी चिमणी एका वनप्रशिक्षणक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दिसून आली. चिखलदरा येथील वनप्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर आकेवार व सहकारी वाय.एस. भाले प्रशिक्षणादरम्यान सेमाडोह परिसरातील कुंवापाटी कॅम्प ते बिच्छुखेडा दरम्यान पायी ट्रॅक करीत होते. जवळपास 19 किलोमीटरपर्यंत घनदाट जंगल गाठल्यानंतर त्यांची नजर एका सागवान वृक्षाला लागून असलेल्या जुळ्या झाडांतील बेफाटीत अधांतरी काही तरी अडकलेल्या काळ्या रंगाच्या वस्तूवर गेली. जवळून निरीक्षण केले असता, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, कातिणीने घट्ट विणलेल्या जाळ्यात तिच्यापेक्षा कितीतरी मोठी असलेली काळ्या रंगाची देवचिमणी अडकली होती. हे दृश्य पाहून ते स्तब्ध झाले. काही वेळ हे चित्र डोळ्यांत साठविल्यानंतर आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात त्यांनी ते टिपले. 


 
देवचिमणीची धडपड शांत
जवळपास दहा ते बारा तासांपूर्वी देवचिमणी जाळ्यात अडकल्याचा अंदाज सुधीर आकेवार यांनी वर्तविला. कारण, तिची धडपड बरीचशी शांत झाली होती, कातीण आपले जाळे चिमणीभोवती घट्ट करीत असल्याचे दिसत होते. या अकल्पनीय दृश्याने आम्ही भारावून गेलो, असे सुधीर आकेवर म्हणाले. 
 
कुंवापाटी ते बिच्छुखेडा परिसरात ट्रॅकिंगवर असताना नदीच्या काठावरील दोन समांतर वाढलेल्या झाडांमध्ये कातिणीने विणलेल्या जाळ्यात देवचिमणी अडकल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले. हा प्रकार यापूर्वी पाहिलेला नाही. 
सुधीर आकेवार, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, वनपरिक्षेत्र महाविद्यालय, चिखलदरा

Web Title: black sparrow found in forest of chikhaldhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.