बीबी खातूनचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:56+5:30

१५ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसांना चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील पडीक विहिरीत एका महिलेचा शिर नसलेला व विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या धडावर शिर नसल्यामुळे तिची क्रूरपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

Bibi Khatun's 'Cold Blooded Murder' | बीबी खातूनचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’

बीबी खातूनचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’

Next
ठळक मुद्देआरोपीविरुद्ध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद : नार्को टेस्ट करण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रागीट व क्रूर स्वभावाच्या जाकीरउद्दीनने पत्नी बीबी खातूनची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून निदर्शनास आले आहे. जाकीरउद्दीनविरुद्ध यापूर्वी हत्येचे दोन गुन्हे, विनयभंग, बलात्कार, घरफोडी व चोरी अशा १७ गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. गुन्हेगारीच्या या दांडग्या अनुभवाच्या जोरावर जाकीरउद्दीनने पत्नीची नियोजनबद्ध हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या बळावरच जाकीरउद्दीनने अद्यापपर्यंत पत्नीच्या हत्येची कबुली दिलेली नाही.
१५ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसांना चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील पडीक विहिरीत एका महिलेचा शिर नसलेला व विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या धडावर शिर नसल्यामुळे तिची क्रूरपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. महिला हरविल्याची तक्रार नसल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.
दरम्यान, मृत महिलेच्या मुलीने व बहिणींनी मृतदेहाची ओळख पटविली. ती महिला बडनेरातील बिलाल कॉलनीतील बीबी खातून असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाइकांनी बीबी खातूनच्या हत्येचा संशय पतीवर व्यक्त केला. त्यातच बीबी खातूनचा पती जाकीरउद्दीनसुद्धा पसार झाला होता. पोलिसांनी जाकीरउद्दीनचा शोध घेऊन त्याला अटक केली. तत्पूर्वी तो ८ नोव्हेंबर रोजी अकोला येथील मेहुणीकडे गेला होता. बीबी खातून ही भोपाळ येथील मुलीकडे गेल्याचे त्याने सांगितले होते. याशिवाय मी तिला मारले नाही, ती जिवंत आहे, असेही तो बोलला होता. यादरम्यान तो बडनेरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या पत्नीकडे नियमित जाऊ लागला. मद्यधुंद अवस्थेत तिच्यासमोर बडबड करीत बीबी खातूनच्या मुलीच्या लग्नात खर्च केल्याचेही बोलला. याच सुमारास त्याला भोपाळ येथील मुलीने फोन करून अम्मीबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्याने बीबी खातून बाजारात गेल्याचे मुलीला सांगितले. अम्मी जेव्हाही भोपाळ यायची, तेव्हा निघण्यापूर्वी व प्रवासादरम्यान सतत फोन करीत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. मात्र, ८ नोव्हेंबर रोजीपासून बीबी खातूनचा मोबाइल स्वीच आॅफ दाखवित होता. या सर्व बाबी लक्षात घेता, जाकीरउद्दीन हा मेहुणी व मुलीसोबत खोटा बोलल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
जाकीरउद्दीनची पहिली पत्नी बीबी खातून व अन्य एक पत्नी या बडनेरात होत्या. याशिवाय त्याचे अनेक महिलांशी संबध होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील पोलीस चौकशीत पुढे आली आहे. जाकीरउद्दीनविरुद्ध पोलिसांनी तांत्रिक पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून, जाकीरउद्दीननेच पत्नी बीबी खातूनची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.

विहिरीत सापडला अर्धवट जळालेला नकाब
चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील विहीर अग्निशमनच्या मदतीने उपसण्यात आली. पाणी बाहेर काढल्यानंतर विहिरीतील एका मातीच्या गोळ्यात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील नकाब आढळून आले. मात्र, विहिरीत बीबी खातूनचे मुंडके किंवा तिचा मोबाईल दिसला नाही. पोलिसांनी यापूर्वी घटनास्थळावरून बीबी खातूनची चप्पल व बांगड्यांचे काही तुकडे जप्त केले आहेत.

बिलाल कॉलनीतून एक किलोमीटर अंतरावर विहीर
बीबी खातूनची हत्या कुठे व कशी झाली, ही बाब अद्याप अनुत्तरितच आहे. मात्र, घटनेच्या दिवशी बिलाल कॉलनीतील घरी बीबी खातून व जाकीरचा कडाक्याचा वाद झाला असावा, त्यानंतर जाकीरने तिची हत्या केली असावी आणि मृतदेह एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिला असावा, तसेच तिचे मुंडके छाटून ते कुठेतरी पुरले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

आरोपी जाकीरउद्दीनविरुद्ध विविध १७ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो पोलीस व न्यायालयीन प्रक्रियेतून गेला आहे. अद्याप त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यावरून त्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त

Web Title: Bibi Khatun's 'Cold Blooded Murder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून