अमरावती : सामंजस्यातून शहराचा विकास करायचा असेल तर समान निधी वाटप करुन प्रशासनाचा कारभार सुरु ठेवावा लागेल, असे महापौरांनी ठरविले. त्यानुसार महापौर नंदा यांनी बुधवारी आयुक्त गुडेवार यांच्या नावे पत्र लिहून १३ वा वित्त आयोगाचे १९ कोटी तर मुलभूत सुविधांचे अडीच कोटी असे एकूण प्राप्त २१ कोटी ५० लाख रुपये निधीे नगरसेवकांना समान वाटप करण्यात यावे, असे कळविले. या पत्रानुसार आयुक्तांनी सुद्धा महापौरांच्या निर्णयाला ‘सर आँखो पर’ माणून याच निर्णयानुसार नगरसेवकांना समान निधी वाटप करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने नगरसेवकांना विविध विकास कामे घेण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांच्याकडे कामांची यादी सोपविण्याचे कळविले आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून महापालिकेत निधी नाही, ही बोंबाबोंब काहीशी पुसून निघणार आहे. समान निधी वाटपामध्ये नगरसेवकांना २५ लाख रुपये तर स्वीकृत पाच सदस्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे देणाचे ठरविण्यात आले आहे. महापौरांचा या आदर्श निर्णयामुळे निधीपासून दुर्लक्षित असलेल्या नगरसेवकांना न्याय देण्याची भूमिका पार पडली आहे. तर निधी वाटपात एकछत्री वर्चस्व गाजवणाऱ्या काही नगरसेवकांमध्ये कमाली नाराजी दिसून येत आहे. सत्तापक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महापौरांच्या या निर्णयाला खेदजनक मानले आहे. सत्तेत असताना थोडाफार जास्त निधी विकास कामांसाठी मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता असून काय कामाची? अशा काही सदस्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. (प्रतिनिधी)
विकासकामांसाठी मिळणार प्रत्येकी २५ लाख
By admin | Updated: July 17, 2015 00:22 IST